लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा मतदार संघ तब्बल १५ वर्षांनी काँग्रेसने सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या रुपाने भाजपकडून खेचून आणला. या विजयाने महाराष्ट्रात काँग्रेस अस्तित्वाला टिकली. या विजयात आमदार विजय वडेट्टीवारांचा सिंहाचा वाटा आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनीही या कामगिरीची दखल घेत वडेट्टीवारांच्या खांद्यावर विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सोपविली. वडेट्टीवारांच्या रुपाने न भुतो असे हे पद मिळाल्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे.अवघ्या काही महिन्यांवर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली. यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू असताना ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार उपनेते विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. ही बाब चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात काँग्रेसला अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र निकालात भाजपने २०१४ च्या निवडणुकीपेक्षाही मुसंडी मारली. महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय संपादन करता आला. बाळू धानोरकर यांना काँग्रेसमध्ये आणून लोकसभा निवडणूक लढण्याची राजकीय खेळी आमदार वडेट्टीवार यांचीच होती. ही ती यशस्वी झाल्याने महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व दिसत आहे. धानोरकरांच्या तिकीटाला पक्षांतर्गत कमालीचा विरोध असतानाही वडेट्टीवारांनी हार मानली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसही त्यांच्या मदतीला धावून आली आणि अखेरच्या क्षणी धानोरकरांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. धानोरकरांना काँग्रेसमध्ये आणण्याचा पहिला प्रयत्न वडेट्टीवारांनी केला नसता तर कदाचित महाराष्ट्र काँग्रेसमुक्त झाला असता. या विजयाने महाराष्ट्राच्या राजकारणात विजय वडेट्टीवार या नावाला वजन प्राप्त झाले.लोकसभेच्या उपलब्धीसह त्यांची कणखरपणे सुरू असेलली राजकीय कारकिर्द पक्षश्रेष्ठींना दखल घेण्यास कारणीभूत ठरली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपूर जिल्ह्याला वडेट्टीवारांच्या रुपाने विधानसभेत मिळालेला सन्मान जिल्ह्यातील काँग्रेससाठी अच्छे दिनची नांदी असल्याचे बोलले जात आहे.
वडेट्टीवारांच्या बढतीने जिल्हा काँग्रेसला नवी ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:04 PM
लोकसभा मतदार संघ तब्बल १५ वर्षांनी काँग्रेसने सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या रुपाने भाजपकडून खेचून आणला. या विजयाने महाराष्ट्रात काँग्रेस अस्तित्वाला टिकली. या विजयात आमदार विजय वडेट्टीवारांचा सिंहाचा वाटा आहे.
ठळक मुद्देजिल्ह्याला विरोधी पक्ष नेतेपदाचा पहिल्यांदाच सन्मान