लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत बिबीला जिल्हा स्मार्ट ग्राम घोषित करण्यात आले असून इतर गावांनी प्रेरणा घ्यावी, अशी कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. शासनाच्या वतीने जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्काराच्या ४० लाख रुपये राशीचा धनादेश दिमाखदार सोहळ्यामध्ये ग्रामपंचायत बिबीला प्रदान करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत बिबीने लोकसहभागातून केलेली कामे जिल्ह्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे. गावातील लोकांचा सहभाग राहिल्यास गाव कसा विकसित होतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बिबी गाव आहे.जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी ग्रामपंचायत म्हणून बिबी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. ग्रामपंचायत बिबीने चंद्रपूर जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला होता. तसेच तालुका स्मार्ट ग्राम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. नागपूर विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी ग्रामपंचायत बिबीची निवड झाली असून नुकतीच विभागीय समितीने तपासणी केली. समितीने गावाची प्रशंसा केली. ग्रामपंचायत बिबीची २०११ च्या जनगणनेनुसार चार हजार ४४४ इतकी लोकसंख्या आहे. एखादा छोटा गाव त्वरित विकसित होऊ शकतो. मात्र मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये स्वच्छता राखणे, शाश्वत विकास घडवून आणणे कठीण काम असते. मात्र बिबी ग्रामपंचायतने ते करून दाखविले असून गावाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.गावात शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, घर व गाव परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्मार्ट विलेज संकल्पनेनुसार उपलब्धी, लोकसहभाग आणि सामूहिक स्वयंपुढाकारातून नाविन्यपूर्ण उपक्रम, परसबाग, वैयक्तिक शोषखड्डे, सार्वजनिक शोषखड्डे, बंद गटारे आदी विविध अशा विषयांवर ग्रामपंचायतने कार्य केले आहे. गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया आसन (बु.), गेडामगुडा, धामणगाव व नैतामगुडा या गावांमध्येदेखील स्वच्छतेचे उत्तम कार्य चालू आहे. प्रत्येक गावात दर रविवारी महिला व पुरुष ग्रामस्वच्छता करीत असतात.गावातील पाणीपुरवठा योजना आर्थिकदृष्टया सक्षम आहे. शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम, सौर ऊर्जा पाणी पंप, बोअरवेल, प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना, गावातील एकूण सर्व पाणीपुरवठ्याच्या सुविधांमधील कुठेही पाणी अनावश्यक वाहत नाही,. ब्लिचिंग पावडरचा नियमित वापर केला जातो. गेल्या तीन वर्षांत गावात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. गावातील सांडपाण्याचे शोषखड्डे, परसबाग, बंदिस्त गटारे इत्यादीद्वारे शास्त्रशुद्ध विल्हेवाट करण्यात आली असून जादुई शोषखड्डयांच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन करण्यात आले आहे. गावातील शाळा व सार्वजनिक इमारतीमध्ये पुरेशी शौचालय व हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावात ठिकठिकाणी कचराकुंड्या व घरोघरी कचरा पेट्या उपलब्ध आहे. गावातील रस्ते, गल्ल्या, घरासमोरील अंगणे, परसदारे यांची रचना, स्वच्छता व सजावट इत्यादी गोष्टींमध्ये ग्रामपंचायत अग्रेसर आहे.गावात सहा सीसीटीव्ही कॅमेरेगावामध्ये ग्रामपंचायतमध्ये संगणक सुविधा, इंटरनेट, वायफाय इत्यादीची उपलब्धता असून गावात सहा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच विशेष बाब म्हणजे आयएसओ मानांकन प्राप्त असलेली जिल्ह्यातील एकमेव पेसा ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत पेपरलेस असून ग्रामपंचायत अंतर्गत देण्यात येणारे १ ते ३३ नमुने आॅनलाईन दिल्या जातात. तसेच ग्रामपंचायतचे स्वतंत्र संकेतस्थळ, फेसबुक पेज, ई-मेल, ब्लॉग असून अशा आधुनिक गोष्टींचा वापर करून ग्रामपंचायत कार्य करीत आहे. विजेची बचत करण्याकरिता गावात पथदिव्यांना टाईमर लावलेले आहे. एकंदरीत बिबी ग्रामपंचायतने केलेले कार्य इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी आहे.
बिबी ग्रामपंचायतीला जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:49 PM
कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत बिबीला जिल्हा स्मार्ट ग्राम घोषित करण्यात आले असून इतर गावांनी प्रेरणा घ्यावी, अशी कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. शासनाच्या वतीने जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्काराच्या ४० लाख रुपये राशीचा धनादेश दिमाखदार सोहळ्यामध्ये ग्रामपंचायत बिबीला प्रदान करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे४० लाखांचे पारितोषिक : शासनाकडून लवकरच होणार सन्मान