लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे जिल्ह्यात ७ जूनपासून सर्व व्यवहार सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली होती. आता यामध्ये पुन्हा वाढ करीत सोमवार (दि.२१) पासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तास जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरु ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे कडक निर्बंध लादण्यात आले. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी दहशत कायम आहे. दरम्यान व्यावसायिक तसेच नागरिकांच्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता देत सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तास व्यवहार करण्यावर सुट दिली आहे. मात्र कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.लाॅकडाऊनच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रुग्ण संख्या घटल्यानंतर निर्बंध शिथिल करीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुट देण्यात आली होती. व्यापाऱ्यांच्या शिष्यमंडळाने निवेदन देत ही वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.
रविवारीही सुरु राहणार व्यवहारअनलाॅक झाल्यानंतर प्रथम जिल्ह्यात रविवारी सर्व व्यवहार बंद होते. आता मात्र नव्या आदेशानुसार रविवारीसुद्धा व्यवहार करता येणार आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर सोडता जिल्ह्यातील बहुतांश शहरामध्ये रविवारी व्यवहार सुरु असते. त्यामुळे व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.