लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या तयार केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी भारतबंद पुकारला होता. या बंदच्या समर्थनार्थ जिल्हाभरात काँग्रेसतर्फे धरणे व उपोषण करण्यात आले. केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करून भाजप सरकार विरूद्ध नारेबाजी करण्यात आली. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पुढाकारातून येथील गिरनार चौकात शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी मागील १०० दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. केंद्र सरकारने आधी चर्चेचा देखावा केला. मात्र, आता या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर अनेक आंदोलने करण्यात आली. खासदार राहुल गांधी यांनी पंजाब, हरियाणा या राज्यात ट्रॅक्टर रॅली काढून सहभाग दर्शविला आहे. काँग्रेसच्या पुढाकारातून सुमारे ६० लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवून कृषी विधेयके रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. आंदोलनात ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, कामगार नेते के. के. सिंग, विनोद दत्तात्रय, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, महिला काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, नम्रता ठेमस्कर, गोपाल अमृतकर, संतोष लहामगे, प्रशांत दानव, ललिता रेवल्लीवार, कुणाल चहारे, हरीश कोतावार, राजेश अडूर, रोशन पचारे, पवन आगदारी, सोहेल शेख, रुचित दवे व अन्य उपस्थित होते.
प्रहार सेवकांनी स्वतःच्या रक्ताने राष्ट्रपतींना लिहले पत्रवरोरा : किसान भारत बंद समर्थनार्थ आणि कृषी कायदे रद्द करण्यासाठी प्रहार पक्षातर्फे रक्तदान करून प्रहार सेवकांनी स्वतःच्या रक्ताने राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पत्र पाठविले. शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ रक्तानेच पत्र लिहून शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. जिल्हासंपर्क प्रमुख गजू कुबडे यांच्या मार्गदर्शनात किशोर डुकरे,अमोल बावणे,जगदीश लांडगे, नितीन नागरकर,संदीप झाडे, हर्षल धोके, आकाश उताणे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.