लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्याचा राकाँने तीव्र निषेध केला. शनिवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलन करून सूत्रधारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिला. संपस्थळी जल्लोष साजरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर समाजकंटक प्रवृत्तीच्या चिथावणी केल्यानेच काही एस. टी. कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप शहर आणि चंद्रपूर ग्रामीण राकाँने जटपुरा गेटजवळ आंदोलनादरम्यान केला. ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या नेतृत्वात ॲड. सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना मागणीचे निवेदन दिले.
जनता कॉलेज चौकात निदर्शने राष्ट्रवादीचे नेते तथा ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात जनता कॉलेज चौकात हल्ल्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसणे हा न्यायालयाचा अवमान व त्यांच्याविरोधातील षडयंत्र असल्याचे डॉ. जीवतोडे यांनी म्हटले. यावेळी संजय सपाटे, अशोक पोफळे, नितीन कुकडे, रवी देवाळकर, आरीफ शेख, संजय बर्डे, आशिष महातले, विनायक बोडाले, ज्योत्सना लालसरे, असलम सुरीया, मंजुळा डुडुरे, प्रशांत चहारे, विजय मालेकर, महेश यार्दी, प्रकाश बेंडले, किशोर ठाकरे, नितीन खरवडे, सचिन सुरवाडे, निर्दोष दहिवले उपस्थित होते.
वरोऱ्यात घोषणाबाजीविधानसभेचे उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या नेतृत्वात वरोरा येथे राकाँने हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. यावेळी विशाल पारखी, जयंत टेमुर्डे, बंडू डाखरे, रंजना पारशिवे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य सरकारने दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी राकाँच्या आंदोलकांनी केली.
नागभिड येथेही निषेधनागभीड येथे राकाँचे तालुकाध्यक्ष विनोद नवघडे, शहर अध्यक्ष रियाज शेख, युवक शहर अध्यक्ष शाहरुख शेख, भाऊराव डांगे आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने या हल्ल्यामागील खरे सूत्रधार शोधून कारवाई करण्याची मागणी केली निवेदनातून केली.