दिलीप मेश्राम
नवरगाव : दोन पायावर धडधाकटपणे चालणारा तरुण, गरिबीचे चटके खाऊन शिक्षण घेतो. नोकरीच्या दारात पोहोचतो. अचानक पायामध्ये असह्य वेदना सुरू होतात आणि कंबरेपासून एक पाय कापावा लागतो. शेवटी नोकरीही गेली व पायही गमावलेला तरुण आता मात्र दिव्यांगाच्या प्रमाणपत्रासाठी धडपडताना दिसत आहे.
आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे. कुठे तरी नोकरी मिळाली पाहिजे. त्यामुळे पुढे आपल्याला सुख मिळेल ही भाबडी आशा घेऊन प्रत्येक मुलाचे आई-वडील जगत असतात. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अनेक हालअपेष्टा सहन करून मुलाला शिकविण्याचा प्रयत्न करतात. आपले जीवन मजुरी करण्यात, ग्रामीण भागात गेले; परंतु आपल्या मुलाच्या वाट्याला ते दिवस येऊ नयेत, ही अपेक्षा असते.
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील दिनेश भालचंद्र चावरे या २७ वर्षीय तरुणाने आपल्या आई-वडिलाचे स्वप्न साकार करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन कृषी पदविकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर पाॅलिटेक्निकचे शिक्षण सुरू असताना स्पर्धा परीक्षेमध्ये उतरला. कृषिसेवक या पदाची परीक्षा दिली आणि पासही झाला. जाॅइंट लेटर मिळाले. दिनेशसह कुटुंबीयांना खूप आनंद झाला; परंतु जाॅइंट होण्याच्या कालावधीमध्येच उजव्या पायात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. उपचारादरम्यान नोकरीवर रुजू होण्याचा कालावधी निघून गेला आणि दिनेशसह कुटुंबीयांचे पाहिलेले स्वप्न क्षणात उद्ध्वस्त झाले.
तपासणीअंती पायामध्ये ॲस्टोम्लायसीस नावाची व्याधी जडल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये हाडातील द्रव कमी होऊन हाडे ठिसूळ व्हायला सुरुवात झाली. जखमेनुसार उपचार सुरू झाले. २०१८ पासून साडेतीन वर्षांच्या कालावधीमध्ये छोट्या-मोठ्या आठ शस्त्रक्रिया करून थोडा थोडा पाय कापत अखेर उजवा पाय कमरेपासून कापण्याची वेळ दिनेशवर आली. यामध्ये मिळालेली नोकरी ही गेली आणि एक पायही गमवावा लागल्याने झालेल्या दुःखातून तो आणि त्याचे कुटुंबीय आजही सावरले नाहीत. आता तो दिव्यांगाच्या प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करतोय. मात्र, ते मिळत नसल्याने शासकीय योजनांच्या लाभापासून त्याला वंचित राहावे लागत आहे.
140821\img_20210808_174200.jpg
पाय गमावलेल्या दिनेश