अहीर यांच्या सूचना : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची आढावा बैठकचंद्रपूर : जिल्हा ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी जलद गतीने करा, अशा सूचना केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी अंमलबजावणी यंत्रणेला दिल्या.ना. अहीर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत जिल्हा स्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरूनुले, आमदार नाना शामकुळे, अॅड. संजय धोटे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, ईश्वर मेश्राम, सविता कुडे व प्रकल्प संचालक अंकुश केदार उपस्थित होते.या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, संपूर्ण ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, भूमिअभिलेख्यांचे संगणकीकरण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे मार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजना, राजीव गांधी राष्ट्रीय ग्रामीण विद्युतीकरण योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, इंदिरा आवास योजना, मागास क्षेत्र अनुदान निधी व प्रशासकीय खर्च या बाबींचा आढावा अध्यक्षांनी या बैठकीत घेतला.तत्पूर्वी २३ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत विचारलेल्या मुद्यांच्या अनुपालनावर चर्चा करण्यात आली. मागील बैठकीचे इतिवृत्त अध्यक्षांच्या परवानगीने कायम करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष म्हणाले, शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना देण्यासाठी उपाययोजना करा. योजनांची अंमलबजावणी करताना यंत्रणेला जानवलेल्या अडचणी संदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे बैठकीत ठरले.कृषी वीज जोडण्या जलद गतीने देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने योग्य नियोजन करा असे त्यांनी सांगितले. या बैठकीत आमदार व सदस्यांनी विविध समस्या व प्रश्न मांडले. प्रश्न सोडविण्यासाठी यंत्रणेनी तात्काळ उपाययोजना आखाव्या अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या. बैठकीचे संचालन व आभार अंकुश केदार यांनी मानले. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समितीचे सभापती व विविध खाते प्रमुख उपस्थित होते. या बैठकीनंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा आढावा ना. हंसराज अहीर यांनी घेतला. (नगर प्रतिनिधी)
विकास कामे जलद गतीने करा
By admin | Published: November 17, 2014 10:49 PM