रमेश नान्ने - पेंढरी (कोके)राष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा ही भूमी ‘क’ वर्ग तीर्थस्थळ म्हणून घोषित झाली आहे. क वर्गाच्या दर्जानुसार या भूमीचा विकास करण्यासाठी शासनाकडून चार ते पाच कोटींचा निधी मिळतो. परंतु काही लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या अपेक्षित धोरणामुळे तपोभूमी विकासापासून कोसोदूर आहे. त्यामुळे अर्धशतकोत्तरी गोंदोडा यात्रेची उपेक्षा कधी संपणार, असा प्रश्न भाविकांनी केला आहे.तत्कालीन राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे यांच्या निधीतून अपूर्ण बांधकाम असलेले समाजमंदिर, खासदार नामदेवराव दिवटे यांच्या निधीतून पाच लाखाचे मंदिरासमोरील सभागृह, खा. प्रा. महादेवराव शिवणकर यांच्या निधीतून २० लाख रुपयाचे राष्ट्रसंताच्या निवासस्थानाचे जिर्णोद्वार, राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निधीतून मंदिराच्या गाभाऱ्याचे १० लाखाचे तसेच आश्रमाभोवती २० लाखाची संरक्षण भिंत, बंटी भांगडिया यांच्याकडून १० लाखाचे अपूर्ण बांधकाम असलेले महाद्वार, तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर यांच्या निधीतून दीड कुटीचे बांधकाम, चिमूरचे सामाजिक कार्यकर्ते भीमराव ठावरी यांच्यातर्फे कार्यक्रम मंचाचे बांधकाम, गावकऱ्यांतर्फे मंडपाचे सिमेंटचे खांब, लोक सहभागाच्या देणगीतून मंदिराचे बांधकाम, लोकसहभागाच्या देणगीतून राष्ट्रसंताच्या निवास स्थानाभोवती संरक्षण भिंतीचे काम, तपोभूमीतील गुंफ्याच्या सभोवताली तीन लाखाची संरक्षण भिंत, लोक श्रमदानातून व आर्थिक सहभागातून तपोभूमी परिसरात तब्बल १६ वनराई बंधारे प्रा. एन. बी.लोनबले यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आले. त्यामुळे गावातील विहिरी, नदी, नाल्यांची पाणी पातळी वाढून शेतकरी व गावकऱ्यांना त्याचा लाभ झाला. परंतु, या गंभीर बाबीकडे शासन व प्रशासन यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पाणी अडवा-पाणी जिरवा या प्रचलित म्हणीचे ‘पैसे अडवा, पैसे जिरवा’ अशी विरुद्ध म्हण झाली आहे. क वर्ग दर्जानुसार शासनाने तपोभूमीच्या विकासासाठी काहीच मदत केली नाही. तिर्थस्थळ विकास योजनेअंतर्गत ब दर्जा मिळावा, अशी गुरुदेव भाविकांची मागणी आहे. (समाप्त)
अर्धशतकोत्तरी गोंदोडा यात्रेची संपणार का उपेक्षा?
By admin | Published: January 01, 2015 10:58 PM