रवी जवळे - चंद्रपूरमागील वर्षी महावृष्टीने हैराण झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. २५ आॅगस्टपर्यंत पावसाची टक्केवारी केवळ ४९.१ एवढी कमी आहे. चारगाव आणि चंदई प्रकल्प सोडले तर उर्वरित सर्व धरणातील पाण्याची स्थिती भर पावसाळ्यातच चिंताजनक आहे. नदी-नाल्यांचीही स्थिती वेगळी नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यात उद्योगांचा भडीमार आहे. त्यांच्याकडून होणारा पाण्याचा उपसाही मोठा आहे. अशा पार्श्वभूमीवर पाण्याचे आतापासूनच नियोजन होणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर नसून पाण्याच्या नियोजनासंदर्भात अद्याप एकही बैठक झाली नसल्याची माहिती आहे. यामुळे यंदा २०१०-११ चीच पुनरावृत्ती होणार तर नाही ना, अशी भीती आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती. यावेळी मात्र त्याने हुलकावणी दिली.जूृन महिन्यात मृग नक्षत्रानंतर पावसाला सुरूवात होते. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी १८५.९१ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी जून महिन्यात मृग नक्षत्र कोरडा गेला. त्यानंतरही पाऊस पडला नाही. जून महिन्यात केवळ सरासरी ६१.४२ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्यातील पावसाची टक्केवारी स्केवळ ३३ टक्के होती.जूलै महिन्यात पाऊस सरासरी ओलांडून बरसतो, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा या पावसाच्या महिन्यातही पावसाने दगा दिला. सरासरीच्या तुलनेत केवळ ७७ टक्के पाऊस पडला.आॅगस्ट हादेखील पावसाचाच महिना आहे. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३४३.१६ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात या महिन्यात केवळ ८५.७९ मिमी पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यात पावसाची टक्केवारी केवळ २५ एवढी आहे. एरव्ही आॅगस्ट महिन्यात जलाशये तुडूंब भरली असतात. मात्र यावेळी धरणात एकूण ५६.७२ टक्के जलसाठा आहे.पकडीगुड्डम धरण तर जवळजवळ कोरडेच पडले आहे. याशिवाय जिल्ह्यातील इरई, उमा, शिरणा, वर्धा यासारख्या नद्यात व नाल्यांमध्येही पाण्याची पातळी ठिक नाही. बोडी-तलावांमध्येही हीच स्थिती आहे. पावसाळ्यातच पाण्याची एवढी भयावह स्थिती असताना जिल्हा प्रशासनाकडून पाणी नियोजनासंदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे जलसाठा झपाट्याने कमी होऊन उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.
चिंताजनक स्थितीतही पाणी नियोजनाचा विसर
By admin | Published: August 25, 2014 11:53 PM