सत्ताधारी पक्ष : नव्यानेच प्रवेश घेतलेल्या नेत्यांची आर्त हाकलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : केंद्र, राज्य, जिल्ह्यातील मतदार संघात, शहरात एका राजकीय पक्षाचा बोलबाला असल्याने तीन पक्ष सोडून एका नेत्याने सत्ताधारी पक्षात आपल्या समर्थकासह प्रवेश केला. तीन पक्षात असताना अवघ्या काही हजार मतांनी मुंबईवारी तीन वेळा हातातून गेली. आता तरी मुंबई वारी चुकू नये, यासाठी सत्ताधारी पक्षाची निवड केली. सत्ताधारी पक्षाच्या बॅनरवर नेत्यांसोबत आपला फोटो लागत नसल्याने व बराच कालावधी होवूनही आपल्याला पक्षाने नेता म्हणून स्वीकार केला नसल्याचे लक्षात आल्यावर ‘मान देवू नका, पण अपमानीतही करू नका’, अशी आर्त हाक पक्षश्रेष्ठींना दिली आहे. परिणामी पक्ष श्रेष्ठींसह निष्ठावंत कार्यकर्ते आश्चर्यचकीत झाले आहेत.मागील कित्येक वर्षांपासून वरोरा - भद्रावती मतदार संघातील निवडणुकीला हमखास निवडून येण्याची चर्चा असणाऱ्या नेत्याला तीनदा धोबी पछाड मिळाली. त्यामुळे त्यांनी एक-एक करीत तीन पक्ष बदल केले. सध्या केंद्रात हुकमी असलेल्या पक्षात आपल्या समर्थकासह बॅन्डवाज्यासह प्रवेश केला. ‘तुम्ही या मतदार संघाची चिंता करू नका, वादा कागदावरचा की खरा’, असा शब्द प्रवेश घेताना पक्षश्रेष्ठींनी दिला. त्याप्रमाणे नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्याने आपल्या समर्थकासह पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जीवाचे रान केले. स्वत: ते सांगतात की, त्यांच्या प्रचारामुळे शहरात, पंचायत समितीमध्ये व जिल्हा परिषदेच्या जागांवरही यश मिळाले. सत्ताकाबीज झाल्यानंतर विजयी उमेदवारांचे सर्वत्र पोस्टर्स लावण्याची स्पर्धा सुरू आहे. परंतु निवडणुकीत नाही, पण सत्ता आल्यानंतर अभिनंदनपर पोस्टरवर आपला फोटो वरच्या रांगेत असावा, असे या नेत्याला मनातून वाटत होते. परंतु काही महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या नेत्याला निवडणुकीत आणि त्यानंतर अभिनंदन व कार्यक्रमात अग्रस्थान देण्यात येत आहे. जाहीर कार्यक्रमातही त्या नेत्याला विशेष स्थान दिले जाते, याकडे आजतागत नुकत्याच प्रवेश केलेल्या नेत्याने दुर्लक्ष केले. परंतु ही बाब जाहीररीत्या बोलल्यास परत पक्षत्याग करावा लागेल, या भीतीने ‘मान देवू नका, परंतु अपमानितही करू नका’, अशा मजकुराचा संदेश प्रचलित माध्यमाद्वारे दिला. या संदेशामुळे तीन पक्ष सोडून आलेला नेता आपल्या पक्षात रमत नसल्याची चर्चा पुन्हा एकदा जेष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते करू लागले आहेत. या नेत्याने सध्याचा पक्षत्याग केल्यास तो कोणत्या पक्षात प्रवेश करेल, यावरही चर्चा रंगली आहे. कारण सध्या सत्ताधारी पक्ष हाऊसफुल्ल झाले असल्याची खमंग चर्चा नागरिक करीत आहे.धारेवर धरताच ज्येष्ठ नेत्यास आली भोवळतीन पक्ष सोडून आणि तीनदा लढूनही निवडणूक जिंकता आली नाही. त्या नेत्याने वारंवार पक्षामध्ये येण्याकरिता सर्वांकडून प्रयत्न केले. तरीही पक्ष प्रवेश जवळपास एक ते दीड वर्ष होऊ शकला नाही. तेव्हा तीन पक्ष सोडणाऱ्या नेत्याने मतदार संघातील एका जेष्ठ पदाधिकाऱ्याशी जवळीक साधला. त्यांच्याकडून पक्ष प्रवेशाचा शब्द घेतला. ही बाब पक्ष श्रेष्ठींना कळताच मतदार संघातील शब्द देणाऱ्या जेष्ठ नेत्याला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे या जेष्ठ नेत्यास भोवळ आली. त्यानंतर समझोता होवून या तीन पक्ष बदलविणाऱ्या नेत्याचा पुन्हा प्रवेश झाल्याची चर्चा सुरू आहे.
मान देवू नका, पण अपमानीतही करू नका
By admin | Published: May 09, 2017 12:38 AM