सर्वपक्षीय व विविध संघटनांचे एसडीओंना निवेदन
ब्रम्हपुरी : चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश करू नका, या मागणीसाठी १२ फेब्रुवारी रोजी सर्वपक्षीय व विविध संघटनांच्या वतीने हजारो आक्षेप अर्जाचा सामूहिक गठ्ठा घेऊन पविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
त्यानंतर सर्वांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी येथील जनसंपर्क कार्यालयावर धडक देत निवेदन दिले. यावेळी ना. वडेट्टीवार यांनी फोनद्वारे आंदोलनकर्त्याशी चर्चा करून ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठोस आश्र्वासन दिले. चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ब्रम्हपुरी तालुक्याचा समावेश करू नये, यासाठी आतापर्यंत चार हजार लोकांनी वैयक्तिक आक्षेप अर्ज नोंदविले तर सात हजार लोकांनी सिनियर सिटीझन संघटनेच्या वतीने सह्यांचे निवेदन दिले आहे. तर हजारो लोकांनी वैयक्तिक ईमेलद्वारे आक्षेप नोंदविले आहे. अनेक पक्ष आणि विविध संघटनांच्या वतीने आक्षेप नोंदविले असल्याचे चर्चेत सांगण्यात आले आणि सध्या ग्रामपंचायत सरपंच निवडणूक सुरू असल्याने आक्षेप अर्ज नोंदविण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली. भविष्यात जिल्हा निर्माण करतांना ब्रम्हपुरीलाच जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली. निवेदन देऊन झाल्या नंतर लगेच माजी आमदार अतुल देशकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठक घेऊन पुढील रणनिती आखण्यात आली व एकाच वेळेस सिंदेवाही, नागभीड आणि ब्रम्हपुरी तालुका कडकडीत बंद करून तीव्र आंदोलन छेडण्यासाठी महत्वाची बैठक १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केली आहे. निवेदन देताना माजी आमदार अतुल देशकर, प्रा.बजाज, चोले, सुधीर सेलोकर, प्रभाकर सेलोकर, विनोद झोडग, ड्रा. प्रेमलाल मेश्राम, नरू नरड,प्रा. संजय मगर ,सामाजिक प्रा.देवेश कांबळे, सुखदेव प्रधान ,प्रा.प्रकाश बगमारे ,पंचायत समिती सभापती रामलाल दोनाडकर, उपाध्यक्ष सुनिता ठवकर आदी उपस्थित होते.