घुग्घुस : पतीने मारहाण, सिगारेटचे चटके देऊन, मुंडण करून दोन महिने डांबून ठेवलेल्या पत्नीची तिच्या आईने पोलिसांच्या व समाजसेविकांच्या सहकार्याने सुटका केली. सदर पीडित महिला अतिशय मानसिक धक्क्यात होती. आता हळूहळू तिची मानसिक स्थिती बळकट होत असून तिने आपल्या क्रूरकर्मा पतीला कडक शिक्षा द्यावी, असा टाहो फोडला आहे. घुग्घुस येथील एका कारखान्यात सुरक्षा प्रहरी म्हणून काम करणारा हा क्रूरकर्मा भास्कर ठवसे माजी सैनिकही आहे. त्याने पोंभुर्णा तालुक्यातील एका खेडे गावातील मित्राला पकडून पत्नीचा मृत्यू झाला, अशी खोटी बतावणी करून २२ वर्षीय देखण्या तरुणीसोबत २० फेब्रुवारीला साध्या पद्धतीने मंदिरात लग्न केले. व तिला घरी आणले. तिच्याशी आठ - दहा दिवस गुण्यागोविंदाने घालविल्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बेदम मारहाण सुरू केली. कधी वायरने मारहाण करायचा तर कधी सिगारेट तर वायर गरम करून शरीराला चटके द्यायचा. एवढेच नाही तर तिचे मुंडणही करून टाकले. तिची बईण व भाऊजी आठ दिवसांपूर्वी येऊन गेले. मात्र तिने काही सांगू नये म्हणून भास्कर तिच्या मागेच राहिला. तरी वेळ मिळताच थोडक्यात प्रकार सांगून आईवडिलांना खबर द्या व मला न्या, असा निरोप पीडित पत्नीने दिला. आई-वडील खेड्यात राहत असल्याने त्यांना बातमी उशिरा मिळाली आणि दोघेही घुग्घुस येथे मुलीच्या भेटीकरिता आले. मात्र सदर प्रकाराची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचू नये, याची दक्षता यावेळीही तिच्या नवर्याने घेतली. तरी रात्री वेळ मिळताच बाथरुममध्ये जाऊन पीडित महिलेने शरीरावरील जखमा मोबाइलच्या प्रकाशात आईला दाखविल्या. तिच्या आईने लगेच दुसर्या दिवशी परत येऊन त्यांनी चंद्रपूरच्या अर्चना डोंगरे व नीता रागीनवार यांना घेऊन ७ मे रोजी घुग्घुस पोलीस ठाणे गाठले व तिची सुटका केली.आज प्रस्तुत प्रतिनिधीने चंद्रपूर येथील बाबुपेठमध्ये राहणार्या तिच्या बहिणीच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. यावेळी ममता खैरे, रेखा गेडाम, वंदना रामटेके, प्रतिमा करमकर उपस्थित होते. तिची ढासळलेली मानसिक स्थिती पूर्ववत येत आहे. तिने यावेळी आपबिती सांगितली व शरीरावरील डाग दाखविले. सदर क्रूरकर्मा पती सध्या जामिनावर सुटला आहे. त्यामुळे पीडित महिलेचे कुटुंब भयभीत आहेत. तरीही त्या नराधमाला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे. (वार्ताहर)
‘त्या’ क्रूरकर्म्याला कडक शिक्षा द्या
By admin | Published: May 11, 2014 12:11 AM