लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : गवराळा जुनी वस्ती गावठानमधील नागरिकांना जागेची आखिव पत्रिका व भद्रावती शहराचा सीटी सर्व्हे करावे आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष मीनल आत्राम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.भद्रावती शहरातील गवराळा वॉर्ड ही जुनी ग्रामपंचायत होती. हे गाव १०० वर्षांपूर्वीचे असून पिढ्यान्पिढ्या येथील नागरिक वस्ती करून राहत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गावावर अन्याय झाला. नागरिकांना अजूनपर्यंत जागेची आखिव पत्रिका देण्यात आली नाही. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आखिव पत्रिका किंवा जागेचा सातबारा असेल तरच नागरिकांना घरकूलचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे गवराळा येथील नागरिकांना प्रधानमंत्री आवास घरकूल योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. गवराळा गावठान व भद्रावती शहराचे सीटी सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव संचालक जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख कार्यालय पुणे यांच्याकडे प्रलंबित आहे. शहराचा सीटी सर्व्हे करण्यासाठी चार कोटी भरावे, असे संचालक जमाबंदी आयुक्तांनी भद्रावती नगर परिषदेला पत्राद्वारे कळविले. नगरपालिकेजवळ चार कोटीचा निधी जमा नसल्याने मुख्याधिकाऱ्यांनी प्रस्तावाकडे पाठ फिरविली आहे. भद्रावती शहराचे सीटी सर्वेक्षण झाले नाही तर नागरिकांच्या जागेचे कागदपत्र तयार होणार नाही. प्रधानमंत्री आवास तसेच शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे गवराळा वॉर्ड व शहराचे सर्वेक्षण करून जमिनीची आखिव पत्रिकेसाठी चार कोटी रुपये निधी आणि संचालक, जमाबंदी आयुक्त, भूमी अभिलेख यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळीे माजी नगरसेवक नाना दुर्गे, विक्रांत बिसेन, सचिन जयस्वाल, छाया आडे, वर्षा किन्नाके, सीमा आत्राम, मनिषा कन्नाके, वैशाली तोडासे, योगिता घोरूडे, कुसुम बोढे, बुधाराम मेश्राम, रामदास मडावी, राजकुमार कृष्णपल्लीवार, योगेश मॅनेवार, प्रमोद ढगे, रिना आमटे, गोविंदा येरमे उपस्थित होते.
आखिव पत्रिकेसाठी सर्वेक्षण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:33 PM
गवराळा जुनी वस्ती गावठानमधील नागरिकांना जागेची आखिव पत्रिका व भद्रावती शहराचा सीटी सर्व्हे करावे आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष मीनल आत्राम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
ठळक मुद्देशिष्टमंडळाची मागणी : निवेदनातून पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष