खासगी रुग्णालय : व्हिलचेअर रॅम्प, लिफ्टचा अभाव चंद्रपूर : रुग्णसेवेच्या नावावर टोलेजंग इमारती उभारून आपला व्यवसाय थाटणाऱ्या शहरातील काही डॉक्टरांनी रुग्णांकडून वारेमाप पैसा उखळणे सुरु केले आहे. विशेष म्हणजे, ज्या प्रमाणात पैसे उखळण्यात येत आहे. त्या तुलनेत सुविधा मात्र पुरविण्यात येत नाही. काही डॉक्टरांच्या इमारतीमध्ये रुग्णांसाठी व्हिलचेअर रॅम्प नाही. एवढेच नाही तर साधी लिफ्टची सुविधासुद्धा नाही. काहींनी तर, रुग्णवाहिकेचा नवा गोरखधंदा सुरु केला आहे. कोणतीही परवानगी न घेता जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णवाहिका उभ्या ठेवून येथील रुग्णांना अक्षरश: पळविणे सुरु केले आहे. हा प्रकार प्रशासन उघड्या डोळ्यांनी बघत असतानाही कारवाई करण्याचे धाडस दाखवित नसल्याचे चित्र आहे.शहरातील ५० च्या वर असलेल्या खासगी डॉक्टरांनी मंजुर नकाशा नुसार रुग्णालयाचे बांधकाम केले नाही. एवढेच नाही तर रुग्णालयात आवश्यक सुविधाही पुरविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. गंभीर रुग्णांना रुग्णालयातील अंतर्गत परिसरात पोहचविण्यासाठी व्हिल चेअर रॅम्प असणे गरजेचे आहे. असे असतानाही याकडेही दुर्लक्ष केले गेले आहे. काही रुग्णालय याला अपवाद आहे. विशेष म्हणेज, काही रुग्णालयात लिफ्टची सुविधाही नाही. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अद्यावत सुविधा असणे अपेक्षित आहे. त्यानुसार रुग्ण त्या रुग्णालयात जातो. मात्र केवळ नावावरून डॉक्टरमंडळी खपवून घेत आहे.काही रुग्णालयात लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या लिफ्टचा उपयोग केवळ डॉक्टरच करताना दिसून येते. अनेकवेळा रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी या लिफ्टचा उपयोग करण्याचा प्रयत्न केल्यास मज्जाव केला जातो. एवढेच नाही तर त्यांना धाकधपटही करण्यात येत आहे. अशावेळी रुग्ण तथा त्याचे कुटुंबीय निमुटपणे ऐकूण उपचार करून घेत आहे.शहरातील काही डॉक्टरांनी रुग्णवाहिकेची सेवा सुरु केली आहे. या माध्यमातून डॉक्टरमंडळी रुग्णांकडून अतिरिक्त पैसा वसुल करीत आहे. स्वत:च्या रुग्णालयाचे नाव असलेल्या अनेक रुग्णवाहिका जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आतील भागात उभ्या केल्या जात आहे. येथे रुग्णवाहिका उभ्या ठेवण्यासाठी शासनाकडून किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून कोणताही परवानगी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे, रुग्णवाहिकेच्या चालकांना केवळ आपल्याच रुग्णालयात रुग्णांना आणण्याचा सल्लाही दिला जात आहे. या रुग्णवाहिका जिल्हा सामान्य रुग्णालयात आलेल्या रुग्णांना येथे उपचार योग्य मिळत नाही. स्वस्त दरामध्ये खासगी रुग्णालयात सेवा मिळते, असे खोटे आश्वासन देवून रुग्णांना अक्षरश: पळवून नेत असल्याचे चित्र जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या दिसत आहे. एक दोन नाही तर, तब्बल दहा ते ते बाराच्या संख्येने खासगी डॉक्टरांच्या रुग्णवाहिका येथे असून आपापल्या रुग्णालयात रुग्णांना घेऊन जात आहे. प्रकृतीने त्रस्त आणि गावखेड्यातून आलेले रुग्ण या रुग्णवाहिकेच्या चालकांच्या आश्वासनाला बळी पडत आहे. विशेष म्हणजे, काही सामाजिक संस्थाच्या रुग्णवाहिका चालकही खासगी डॉक्टरांकडून कमिशन घेऊन रुग्णांना त्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देत आहे. या प्रकारामुळे मात्र रुग्णांना आवश्यक ते डॉक्टर आणि उपचार मिळणे कठिण झाले आहे.(लोकमत चमू)
रुग्णवाहिकेच्या नावावर डॉक्टरांचा गोरखधंदा
By admin | Published: January 20, 2015 12:02 AM