चंद्रपूर : महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे मृत्यू झाल्याच्या दिवशी सकाळपासून घराबाहेर निघाल्या नव्हत्या, अशी माहिती सूत्राने दिली. त्या दररोज सकाळी ९ वाजता न चुकता कार्यालयात जायच्या. परंतु मृत्युच्या दिवशी मात्र त्या बाहेरच आल्या नाहीत, अशी माहिती ‘लोकमत’ला मिळाली.
डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्युला पाच दिवसांचा कालावधी लोटूनही मृत्युचे गूढ उकलले नाही. परंतु डाॅ. शीतल यांनी मृत्युपूर्वी आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या रुग्णालयातून कुत्र्याला देण्याचे कारण सांगून सिरिंज मागितल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. शवविच्छेदन अहवालात डाॅ. शीतल यांच्या उजव्या हाताला इंजेक्शन टोचल्याची खूण आढळली. या आधारे त्यांनी इंजेक्शन टोचून आत्महत्या केला असावी, असा कयास लावला जात आहे. मात्र त्यांनी इंजेक्शनमध्ये कोणत्या औषधाचा वापर केला, ही बाब अद्यापही स्पष्ट झालेली नाही. यामुळे अद्याप मृत्युचे कारण रहस्यमय बनले आहे. मृत्युचे नेमके कारण कळणार नाही तोपर्यंत डाॅ. शीतल यांची आत्महत्या असेल तर ती कोणत्या कारणाने केली, याचा शोध लावणे अवघड झाले आहे. त्यांनी आत्महत्या केली वा अन्य कारणाने मृत्यू झाला, याचाच शोध पोलीस घेत आहे. पोलिसांनी आतापर्यंत घटनास्थळावरून डाॅ. शीतल यांच्या हाताला टोचलेले इंजेक्शन, न वापरलेल्या सिरिंज, संशयास्पद औषध, गोळ्या, मोबाईल, लॅपटाॅप, टॅब आदी साहित्य ताब्यात घेतले आहे. याचा ताळमेळ डाॅ. शीतल यांच्या मृत्युपूर्वी घडलेल्या घटनाक्रमाशी जोडण्याचे काम पोलीस करीत आहेत.
पोलीस म्हणतात, दोन सबळ पुरावे आढळले
डाॅ. शीतल यांच्या मृत्युप्रकरणी दोन सबळ पुरावे आढळल्याचे पोलीस सूत्र सांगत आहे. हे पुरावे सर्व बाजूने जुळतात वा नाही याचा तपास सुरू आहे. शुक्रवारी काही पुरावे चंद्रपूर येथील न्यायवैद्यक प्रयोग शाळेत तपासणीसाठी दिल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
कुत्र्याचे इंजेक्शन घेतल्याची अफवा
डाॅ. शीतल आमटे यांनी कुत्र्याला मारण्याचे इंजेक्शन घेतल्याची अफवा होती. याची शहानिशा केली असता ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. आत्महत्येच्या काही वेळापूर्वी डाॅ. शीतल यांनी आनंदवनातील रुग्णालयातून कुत्र्याला इंजेक्शन द्यायचे असल्याचे कारण सांगून सिरिंज मागितल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. ते औषध नेमके कोणते याचाच उलगडा अद्याप न झाल्याने ही अफवा हास्यास्पद असल्याचेही सूत्राने सांगितले.