आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : घुग्घुस पंचायत समितीच्या सदस्य शालू शिंदे यांनी ९ जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मारेगाव येथील फोटोग्राफर शेषराज मडावी याला घुग्घुस पोलिसांनी गुरुवारी अटक केली. दरम्यान, शेषराजचा भाऊ ज्ञानेश्वर मडावीने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन शालुने घरगुती वादातून आत्महत्या केल्याचे सांगत आपल्या भावाला या प्रकरणात नाहक गुंतविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे.पत्रकार परिषदेत माहिती देताना ज्ञानेश्वर मडावी यांनी सांगितले की मृतक शालू आणि शेषराजची भेट २०१५ मध्ये एका लग्नात झाली होती. तेव्हापासून शालूचे व शेषराजचे व्यावसायिक संबंध होते. घटनेच्या दिवशी शेषराजला मुंबईला जायचे होते. त्यावेळी शालूने शेषराजला फोन केला होता. दरम्यान, शालूने आपण घरगुती वादातून त्रस्त असल्याचे शेषराजला सांगितले. भ्रमणध्वनीवरूनच शेषराजने तिची समजूत घातली. याच दरम्यान पोलिसांनी शालूच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून माहिती घेत शेषराजचा क्रमांक मिळविला. शेषराज मुंबईला गेला होता. यावेळी त्याला घुग्घुस पोलिसांनी फोन करुन शालूच्या आत्महत्येप्रकरणी बयाणासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलविले. मात्र आपण मुंबईला असल्याचे शेषराजने सांगितले. तरीही पोलिसांनी १५ जानेवारीला पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्यास सांगितले. त्यानंतर १५ जानेवारी घुग्घुस पोलिसांनी पुन्हा भ्रमणध्वनी करुन १७ जानेवारीला पोलीस स्टेशनमध्ये बोलविले.१७ जानेवारीला दुपारी २ वाजता शेषराज पोलीस स्टेशनमध्ये गेला असता त्याला रात्री ८ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. त्यानंतर घटनेच्या दिवशी शेवटचा फोन शेषराजचा असल्यामुळे त्याला रात्री ९ वाजताच्या सुमारास अटक केली. मात्र या प्रकरणात आपल्या भावाचा कोणताही संबंध नसून घरगुती कारणामुळेच शालूने आत्महत्या केल्याचा आरोप ज्ञानेश्वर मडावीने केला. यावेळी शेषराजची पत्नी कविता मडावी यादेखील उपस्थित होत्या.वारंवार फोन करून धमकीमृत शालू शेषराजला वेळीअवेळी फोन करीत असायची. त्यामुळे शेषराजच्या पत्नीने आपल्या पतीला वारंवार फोन करु नये, असा शालूला समज दिला होता. मात्र आपणाला शेषराजशी बोलू न दिल्यास आत्महत्या करणार, अशी धमकी शालू देत असल्याची माहिती कविता मडावीने पत्रकार परिषदेत दिली.