चंद्रपूर : जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याने काही विचित्र प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहेत. मात्र, नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी केले. ओम शांती गणेश मंडळ ताडाळी व पोलीस स्टेशन पडोलीच्या संयुक्त विद्यमाने ताडाळी येथे ‘जादूटोणाविरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम प्रात्यक्षिकांसह पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंनिसचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे उपस्थित होते. यावेळी ठाणेदार कोंडावर यांनी अंधश्रद्धा जादूटोणाविरोधी कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या सायबर गुन्ह्याबाबतही मार्गदर्शन केले. अनिल दहागावकर यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अंधश्रद्धेबाबत जनजागृती केली.
सूत्रसंचालन व आभार जिल्हा युवा संघटक आणि उपसरपंच निखिलेश चामरे यांनी मानले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अशोक मडावी, नंदू सोनारकर उपस्थित होते. यशस्वितेसाठी ओम शांती गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.