गोंडपिपरी : शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर वाढविण्यासाठी कृषी विभागाने करडई पिकाची योजना आणली. शेतकऱ्यांना बियाणे दिले. अनेक शेत करडईचा पिवळ्या, लाल फुलांनी फुलले. मात्र पीक हातात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी करडईला नकार दिला. शेवटी कवडीमोल भावात शेतकऱ्यांनी मालाची विक्री केली. गोंडपिपरी तालुक्यात कोरडवाहू क्षेत्र मोठे आहे. तालुक्यासाठी करडई वरदान ठरली असती. मात्र बाजारपेठ नसल्याने करडई नकोशी झाली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील शेती बेभरवश्याची आहे. कधी निसर्गाचा लहरीपणाचा फटका शेतीला बसतो, तर कधी अख्ये पीकच वन्यजीवांच्या हैदोसाने भुईसपाट होते. अश्यात कृषी विभागाने करडईच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार आणि त्यांचा टीमने करडईचा पेरा करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. तालुक्यातील अंदाजे २०० एकर शेती करडईच्या फुलांनी फुलली. पीक हातात आले. मात्र करडई खरेदी करण्यासाठी खरीददारच मिळेना, अशी स्थिती झाली आहे. शेवटी तालुक्यातील एका व्यापाऱ्याकडे हमीभावापेक्षा अल्पदराने करडई विकल्या गेली. तर काही शेतकऱ्यांकडे अजूनही करडई पडली आहे.
..तर वरदान ठरेल
गोंडपिपरी तालुक्यात वन्यजीवांची मोठी समस्या आहे. वन्यजीवांच्या हैदोसाने दरवर्षी पिकांचे मोठे नुकसान होत असते. रब्बी पीक असलेल्या करडई पिकाला वन्यजीव तोंड लावत नाही. मात्र गोंडपिपरीत करडई विक्रीसाठी बाजारपेठ नाही. करडईसाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन बाजार उपलब्ध करावा.
- किशोर अगस्ती, प्रयोगशील शेतकरी,धाबा
कोटे
शेतकऱ्यांसाठी करडईचे पीक फायदेशीर आहे. तेल बियाणे असलेले करडई पिकाचा पेरा वाढविण्यासाठी कृषी विभागाने २०२० मध्ये योजना आणली. तालुक्यातील दोनशेच्या आसपास शेतकऱ्यांनी करडईची लागवड केली होती. कोरडवाहूसाठी करडईचे पीक उत्तम ठरू शकते.
- मंगेश पवार, तालुका कृषी अधिकारी, गोंडपिपरी