मागील वर्षी पुरामुळे हाहाकार : शेकडो कुटुंब अजूनही स्थिरावले नाहीत
रवी रणदिवे
ब्रह्मपुरी : मागील वर्षी याच काळात वैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केल्याने जवळपास तालुक्यातील शंभर गावांत पुराचा सामना करावा लागला होता. यावेळी त्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पूरग्रस्त व्यक्त करीत आहेत.
ब्रह्मपुरी तालुक्यातून वैनगंगा नदी वाहत आहे. तालुक्यात पूरपरिस्थिती ओढवावी, अशी स्थिती नाही. तरीही पुराचा सामना करावा लागतो, हे दुर्भाग्य आहे. मध्यप्रदेशात झालेल्या जास्त पावसामुळे ही झळ सोसावी लागत असते. यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे मत अनेक पूरग्रस्त व्यक्त करीत आहेत. या काळात पाऊस समाधानकारक असला तरी पूरपरिस्थिती एवढा नाही, तरी प्रशासनाने पुराचा इशारा शुक्रवारी दिला आहे. त्यामुळे पुन्हा नदीकाठावरील गावकरी भयभीत झाले आहेत.
पूर म्हटले की शेती, पशुधन, घर यांचे उद्ध्वस्त होणारे चित्र डोळ्यांसमोर येते. यामुळे नागरिकांची झोपच उडू लागते. मागील वर्षीच्या महापुरामुळे तालुक्यात चार हजार ६७१ घरांची आंशिक पडझड, ३२ झोपड्या वाहून गेल्या तर ४९० घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे आजही त्या पुराची धग मनात कायम आहे. त्या पुराने जवळपास १५ हजार हेक्टरवरील शेती वाळवंट झाली होती. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला होता. शेतकऱ्यांचे साठवलेले धान्य रस्त्यावर आणून वाळवावे लागले. बेलगाव, लाडज पूर्णतः जलमय झाले होते. साथीच्या आजाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली होती. पूर ओसरल्यावरही कित्येक दिवस ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रूचा पूर कायम होता. आबालवृद्धांपासून सारेच चिंतित होते. अशातच हिरमुसल्या चेहऱ्यांनी पूरग्रस्तांचा पुन्हा गावात प्रवेश होत होता. लाडज तेथील अनेक कुटुंबांनी जि. प. शाळेतच आपले बस्तान मांडले होते. पन्नासहून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. गांगलवाडीतील ३३ केव्ही उपकेंद्र पाण्याखाली आल्याने काही काळ पुरासोबतच काळोख पसरला होता. एवढेच नव्हे तर हेलिकॉप्टरने ग्रामस्थ काढले जात होते. ही व यापेक्षा अनेक गंभीर दृश्ये आजही अंगावर शहारे आणतात. त्यामुळे पुन्हा नको तो पूर असेच अनेक गावकऱ्यांना वाटू लागले आहे.
बॉक्स
पुरात गोसेखुर्दचा कालवा फुटला
एकीकडे पाण्याचा महापूर तर दुसरीकडे किन्हीजवळ गोसेखुर्दचा कालवा फुटल्याने पाण्यात वाढ होऊन परिसर जलमय झाला होता. त्या गोसेखुर्द धरणाची अवस्था आजही ‘जैसे थे’ असल्याने पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आताच लक्ष देणे गरजेचे आहे.
बॉक्स
प्रशासनाने यावेळीही दिला इशारा
गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडल्याने पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन यावेळी सतर्क असल्याने काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे.
240721\17-54-50-chandrapur-gosikhurd.jpg
तालुक्यातील परिसर व शेती अशी जलमय झाली होती