चंद्रपूर : ‘जिवाला जिवाचे दान दिले भीमाने, माणसाला माणूसपण दिले भीमाने...’ सोनू निगम यांनी गायलेल्या या गीताप्रमाणे आम्हाला खरी ओळख बाबासाहेबांमुळेच मिळाली. आतापर्यंत आम्हाला बाबासाहेब कळू दिले नाहीत. तसेच येणाऱ्या पिढीला बाबासाहेब कळावे, या दृष्टीकोनातून मूल तालुक्यातील फुलझरी या छोट्याशा खेड्यात संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली. विशेष म्हणजे या गावात अनुसूचित जातीचे एकही घर नाही. तरीसुद्धा दिवसभर विविध कार्यक्रमांतून बाबासाहेबांचे विचार अंगीकारण्याचा प्रयत्न करण्यात आला. छोटेसे खेडे असणाऱ्या फुलझरी येथील गावकऱ्यांचा हा उपक्रम इतरांना प्रेरणादायी ठरत आहे.
अडीचशे लोकसंख्या असलेले फुलझरी हे छोटेसे गाव. गावाची विशेषत: म्हणजे गावात अनुसूचित जातीचे एकही घर नाही. गावातील सर्वच ग्रामस्थ गुण्यागोंविदाने राहतात. गावात काही सुशिक्षितांनी शिवसूर्य युवा ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपतर्फे महान थोर पुरुषांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याच जनजागृतीतून डॉ. बाबासाहेबांच्या विचारांनी संपूर्ण गावकरी प्रेरित झाले. त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला कळावेत, या उद्देशाने यावर्षीपासून गावात भीमजयंती साजरी करण्याचा ठराव केला. संपूर्ण गावाची सजावट करण्यात आली. १४ एप्रिल रोजी सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण, प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम घेत डॉ. बाबासाहेबांचे विचार अंगीकारण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमासाठी शिवसूर्य युवा ग्रुपचे मार्गदर्शक सुभाष बोरुले, अंकुश कस्तुरे, हरिदास ढोले, जितू बोरुले, रमेश ढोले, आकाश शेंडे, सुधीर बोरुले यांच्यासह गावकऱ्यांनी प्रयत्न केले.
कामावर न जाण्याचा ठराव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ‘कामावर कुणीही जाणार नाही, सर्व जण जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहतील’ असा ठरावच सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत केला. सायंकाळी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत भव्य मिरवणूक काढली. त्यानंतर गावातील चौकात निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण केले. यावेळी प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन व त्यानंतर गावातील मुलांसाठी बुद्ध-भीम गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संपूर्ण गावाची सजावट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण गावाची सजावट करण्यात आली. गावातील चौकात निळे व पंचशील तोरण लावून सजावट करण्यात आली. प्रत्येकाच्या अंगणात रांगोळी काढण्यात आली. लहान-थोरांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व जण या जयंती सोहळ्यात सहभागी झाले होते.
सर्व थोर पुरुषांचे विचार अंगीकारणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. त्यामुळे यावर्षीपासून फुलझरी गावात डॉ. आंबेडकर जयंती, म. फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवून त्यांचे विचार अंगीकारण्याचा प्रयत्न करण्याचा ठराव या गावातील ग्रामस्थांनी केला आहे.
आम्हाला आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळू दिले नाहीत. मात्र, आता ते आम्हाला कळायला लागले आहेत. आमच्या पुढील पिढीला बाबासाहेब कळावेत, या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आता दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करणार आहोत.
- सुभाष बोरुले, मार्गदर्शक, शिवसूर्य युवा ग्रुप, फुलझरी.