चंद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपुरातील प्रसिद्ध डॉक्टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार (वय ९१) यांचे शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी ७.१४ वाजता नागपूर येथे रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष, चिन्मय मिशनचे अध्यक्ष, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. १९६७ मध्ये त्यांनी भारतीय जन संघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडणूक लढवली होती. विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार तथा नेत्रतज्ज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्नुषा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव शनिवारी (दि. ४) सकाळी १०.३० वाजता चंद्रपूर येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता त्यांच्या कस्तुरबा चौक निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार असून, शांतिधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.