वरोरा(चंद्रपूर) : डाॅ. शीतल आमटे-करजगी यांचे पती गौतम करजगी यांनी सहा वर्षीय शर्वील व आपल्या आई-वडिलांना घेऊन आनंदवन सोडले आहे. करजगी कुटुंबीय पुण्याला गेले ही बाब सत्य असली तरी त्यांनी कायमस्वरूप आनंदवन सोडले, याबाबीला अधिकृत दुजोरा मात्र आनंदवनातून मिळाला नाही.डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूनंतर करजगी कुटुंबीयांच्या वतीने श्रध्दांजलीचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमात आमटे कुटुंबातील एकही सदस्य सहभागी झाला नाही. केवळ शोकसंदेश पाठविला होता. ही बाब करजगी कुटुंबीयांना खटकली असल्याचे बोलले जात आहे. याच कारणातून करजगी कुटुंबीयांनी आनंदवन सोडल्याची चर्चा बुधवारी सर्वत्र ऐकायला येत होती. याबाबत आनंदवनातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौतम करजगी हे मुलगा शर्वील व आपल्या आई-वडिलांना घेऊन आनंदवनातून गेले आहेत. पुण्याला स्वगावी गेल्याचे आनंदवनातील काही कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितल्याचे समजले. परंतु ते कायमस्वरुपी गेले नसून डाॅ. शीतल यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्यासाठी शर्वीलला घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. याबाबत डाॅ. शीतल यांचे पती गौतम करजगी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.शर्वीलची टीसी आनंदवनातचकरजगी कुटुंबीयांनी आनंदवन सोडले असल्याचे बोलले जात आहे. ही बाब खरी असली तरी ते कायमस्वरुपी सोडून गेले, याबाबत आनंदवनातून अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाही. त्यांनी कायमस्वरुपी आनंदवन सोडले असते तर शर्वीलचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रही सोबत घेऊन गेले असते. शर्वील हा आनंदवनातच शिकत आहे. त्याची टीसी मात्र त्यांनी नेली नाही. यावरून करजगी कुटुंबीय आनंदवनात परत येतील, असेही आनंदवनातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूचे रहस्य कायम
डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी तपास यंत्रणेला त्यांच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल नेमका केव्हा प्राप्त होईल, याबाबत पोलीसही अनभिज्ञ आहे.