फोटो
वरोरा : आनंदवनात मियावाकी प्रकल्प, शिक्षण व कुष्ठरोगी, अंध अपंगाच्या सेवेला डॉ. शितल यांनी प्राथमिकता दिली. ती विवाहानंतर सून झाली. मात्र अल्पावधीत तिने मुलीचे स्थान मिळविले. महारोगी सेवा समिती आणि आनंदवनात मोठे योगदान दिले. ती जरी प्रत्यक्षात नसली तरी तिच्या आठवणी आणि कार्य सतत स्मरणात राहील, अशा शब्दात डॉ. शितल आमटे करजगी यांचे सासरे शिरीष करजगी यांनी आपल्या भाावना शोक सभेत व्यक्त केल्या.
महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शितल आमटे करजगी यांचे ३० नोव्हेंबर रोजी निधन झाले. रविवारी आनंदवनातील श्रद्धावनात डॉ. शितल यांच्या समाधीस्थळाजवळ श्रद्धांजली वाहण्याकरिता शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील सुजाना देशमुख, भारत जोडोमध्ये सहभागी झालेले दिल्लीचे अनिल हेबर, बालग्राम अनाथ संस्थेचे संतोष गरजे, विवेक तोंडापूरकर यांनी स्व. शितल यांच्या दुरदृष्टीवर प्रकाश टाकीत त्यांनी त्यांची संवेदनशीलता, धैर्य आणि विविध प्रकल्प अधोरेखीत केले. स्व. शितल यांच्या आनंवदनातील भरीव कामाची स्तुती करीत श्रद्धांजली वाहिली. डॉ. सागर वझे, प्रा. डॉ. सुहास पोतदार, अमृता कुलकर्णी, माधवी कुदेकर यांनीही विचार व्यक्त केले. याप्रसंगी फेसबुकवरून थेट जोडलेले इंग्लंड येथील लुसीयन टर्नव्हिस्की, संजीव करजगी यांनीही शब्द सुमने अर्पण केली.
डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांनी पत्राद्वारे पाठविलेल्या शोक संदेशाचे वाचन आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी केले.
बॉक्स
गौतम करजगी निशब्द झाले
डॉ. शितल यांचे पती गौतम करजगी यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करून देत ते निशब्द झाले. उपस्थित सर्वांनाच आपले अश्रु आवरता आले नाही. डॉ. शितल व गौतम करजगी यांच्या सहा वर्षीय शर्विल हा मुलगा हा दु:खद प्रसंग आपल्या डोळ्यात साठवत होता.