उपसा अधिकृत की अनधिकृत ? : पाण्यात आॅईलसह अनेक रसायने चंद्रपूर : नैसर्गिक जलस्रोतातून कोणत्याही उद्देशासाठी विनापरवाना पाण्याचा उपसा करता येत नाही. असे असले तरी स्थानिक दत्तनगर-हवेली गार्डन ते बिनबा या मार्गे वाहणाऱ्या पुरातन नाल्यातून रस्त्याच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा केला जात आहे. हा प्रकार अधिकृत की अनधिकृत याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासकीय अधिकारीही या विषयात गंभीर नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या नाल्यातून पाण्याचा उपसा केला जात आहे. वर्षभरापासून आकाशवाणी ते वडगाव तसेच काही अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्ता बांधकामासाठी याच नाल्यातील पाण्याचा सर्रास वापर केला जात आहे. त्यासाठी आकाशवाणी ते हवेली गार्डन मार्गावरील पुलावर मोटारपंप बसविण्यात आला असून महानगर पालिकेच्या ट्रॅक्टरद्वारे कामापर्यंत पाण्याची वाहतूक केली जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)बांधकामाच्या दर्जावर दुष्परिणामसदर नाल्यातील पाणी अतिशय प्रदूषित असून त्यात आॅईलचे प्रमाणही आहे. अतिशय दुर्गंधी येत असलेल्या या पाण्याचा वापर बांधकामासाठी किती योग्य आहे, असा नागरिकांचा सवाल आहे. सदर पाण्यात आॅईल असल्याने रस्त्याच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. नगरसेवकाने केला विरोधशंकरनगरमध्ये आकाशवाणी ते रायपुरे यांच्या घरापर्यंतचा सिमेंट रोड तयार करण्यात येत आहे. इतर रस्त्यावर नाल्यातील प्रदूषित पाण्याचा वापर करण्यात आला. तोच कित्ता या रस्त्यासाठीही गिरविण्यात येत होता. मात्र या भागाचे नगरसेवक देवानंद वाढई यांनी सदर पाणी रस्त्याच्या कामासाठी वापरू नका, अशी तंबीच कंत्राटदाराला दिली. त्यामुळे मग कंत्राटदाराने त्याच परिसरातील एका खासगी बोअरवेलवरून बांधकामावर मारण्यासाठी पाणी घेतले. त्यानंतर काम पूर्ण करण्यात आले. \
रस्ता कामासाठी गटाराचे पाणी
By admin | Published: February 20, 2016 1:44 AM