सोमवारी स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा झाली.
या समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर झाले. स्थायी समितीमधील १६ सदस्यांपैकी आठ सदस्य निवृत्त झाले. यामध्ये भाजपचे विद्यमान स्थायी समिती सभापती आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोट्टुवार, काँग्रेसचे नीलेश खोब्रागडे, सकिना अन्सारी, विना खनके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला आखरे आणि बसपचे प्रदीप डे यांचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मनपाची आमसभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत स्थायी समितीच्या नवीन भाजप, काँग्रेस, बसप व नगर विकास आघाडीतील आठ नगरसेवकांची नावे द्यावी लागणार आहे. मनपाची पंचवार्षिक निवडणूक व्हायला सुमारे एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. विद्यमान सभापती आसवानी यांना पंचवार्षिक निवडणुका लागेपर्यंत सभापती पदावर कायम राहायचे होते, अशी चर्चा आहे. शिवाय, महापौर पती संजय कंचर्लावार यांनाही सभापती पदाची स्वप्ने पडत होती. परंतु, स्थायी समितीमधून सोमवारी निवृत्त झाल्याने हे स्वप्न भंगल्याची मनपा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
भाजप गटप्रमुख कुणाची नावे पाठविणार ?
भाजपचे गट नेते वसंता देशमुख यांना भाजपच्या स्थायी समितीमधील तीन सदस्यांची नावे पाठविण्याचा अधिकार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देशमुख यांना डावलून रवी आसवानी यांच्याकडे सभापतिपद दिल्याने पक्षात मोठा वाद उफाळून आला होता. देशमुख यांना सभापती पदापासून दूर ठेवण्यासाठी पक्षांतर्गत राजकीय डावपेच आखण्यात आले होते. परिणामी, पुन्हा सभापतिपदी वर्णी लावण्यासाठी आसवानी आणि नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या नावांना गटनेता वसंता देशमुख हे पसंती देणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.