देवाडा बुज : पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बु, वेळवा, उमरी पोतदार, बोर्डा बोरकर आदी बारा गावातील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा देयके भरले नसल्याने खंडित करण्यात आला. त्यामुळे संबंधित गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकण्याची वेळ आली आहे. मात्र जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
काही ग्रामपंचायतींनी नळयोजना हस्तांतरित केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने सुद्धा डोळेझाक केली असल्याने गावातील नळ योजनेचा पाणीपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून ठप्प आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून महिलांना त्रास सहन करून इतरत्र भटकण्याची वेळ आली आहे. अलीकडच्या काळात शासनाने काेट्यवधी रुपये खर्च करून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सोय निर्माण करून दिली. परंतु पाणीपुरवठा विभाग मात्र वीजबिल भरण्यास उदासीनता दाखवत असल्याने नळयोजना कुचकामी ठरत आहे. तेव्हा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.