लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील वैनगंगेच्या काठावरील गावांमध्ये पुराचे पाणी ओसरताच नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यातील जवळपास ५१ गावे महापुराने प्रभावित झाली होती तर २१ गावांना जबरदस्त तडाखा बसला होता. वैनगंगेच्या काठावरील गावात नळ योजनेतून तसेच हातपंपाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या गावांमध्ये नळ योजना असली तरी जलशुद्धीकरणाची सोय नाही. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर आता दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम आहे.गावांमध्ये नळ योजनेबरोबरच हातपंप असले तरी या हातपंपांना दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वैनगंगा नदीचे पाणी गावात शिरल्याने पंपगृह, विहिरी, हातपंप गढूळ पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. तसेच गावातील खासगी विहिरींनासुद्धा दूषित पाण्याचा फटका बसला आहे. अशावेळी गावात असणारे हातपंप गावकऱ्यांसाठी संजीवनी ठरू शकतात. मात्र गावात नळ योजना आल्यानंतर हातपंपाच्या दुरुस्तीकडे, देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पूरग्रस्त नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दूषित पाण्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. गावात पुरामुळे साचलेला गाळ, शिवारातून येत असलेली दुर्गंधी, त्याचबरोबर नळांना, विहिरींना, हातपंपांना येणारे गढूळ पाणी, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धानाचे पीक पूर्णत: नष्ट झाले असून गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने विटा, मातीची घरे कोसळली आहेत. यामुळे नागरिकांची संकटे वाढली आहेत. शासनस्तरावर पूरग्रस्त गावांमध्ये मोठया प्रमाणावर टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी गावगाड्यातील जनावरांची संख्या लक्षात घेता व घरातील गाळाने माखलेल्या साहित्यांच्या साफसफाईसाठी मोठया प्रमाणात पाणी लागत आहे.दूषित पाणी पिऊ नका, पाणी उपलब्ध करू - क्रांती डोंबेपूरग्रस्त गावांमध्ये असलेली एकंदरीत परिस्थिती लक्षात घेत ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी पूर ओसरताच सर्वात आधी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन पूरग्रस्त गावांमध्ये शक्य तेवढया लवकर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले आहे. टँकरने गावोगावी पिण्याचे पाणी कसे उपलब्ध करून दिले जातील, याकडे त्या जातीने लक्ष ठेवून आहेत. पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन नागरिकांना विहिरी, नळ, हातपंपांचे पाणी शुद्ध झाल्याशिवाय पिऊ नका, अशी विनंती करीत आहेत.नाल्यांमध्ये नळयोजनेचे पाईपकिन्ही गावातील नळ योजनेचे पाईप गावातील अंतर्गत नाल्यांमधून टाकले असल्याने आणि पुरामुळे नाल्या तुडुंब भरल्या असल्याने नळाचे पाणी कसे घ्यावे, असा प्रश्न किन्ही गावातील नागरिकांना पडला आहे. येथील हातपंपसुद्धा बंद अवस्थेत असल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठया प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे
पुरानंतर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 5:00 AM
गावांमध्ये नळ योजनेबरोबरच हातपंप असले तरी या हातपंपांना दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वैनगंगा नदीचे पाणी गावात शिरल्याने पंपगृह, विहिरी, हातपंप गढूळ पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. तसेच गावातील खासगी विहिरींनासुद्धा दूषित पाण्याचा फटका बसला आहे. अशावेळी गावात असणारे हातपंप गावकऱ्यांसाठी संजीवनी ठरू शकतात.
ठळक मुद्देअनेक गावात नळ योजना बंद : हातपंपातूनही येतेय दूषित पाणी