लोकमत न्यूज नेटवरचंद्रपूर : चंद्रपुरातील शिवाजीनगरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या ३७ लाखांच्या चोरीचा तडकाफडकी छडा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात लावण्यात पोलिसांना यश आले आहे. इतकेच नव्हे, तर या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १४ लाख १६ हजार ४०० रुपये रोख आणि ७६ तोळे सोने व चांदीचे दागिने किंमत २६ लाख २० हजार ३२३ असा एकूण ४० लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजेंद्र रामपाल जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी वाहनचालक म्हणून असलेला सादिक रफीक शेख हा या घटनेचा मास्टरमाईंड निघाला, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली. अटक केलेले तीनही आरोपी चंद्रपुरातील आहे. सादिक रफीक शेख (३२, रा. जलनगर), महेश गजानन श्रीरामवार (२३, रा. बालाजी वॉर्ड), चेतन कालिदास तेलसे (२२, रा. अष्टभुजा वॉर्ड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सादिक हा चोरीचा मास्टरमाईंड आहे. तो राजेंद्र रामपाल जयस्वाल यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करीत होता. काही महिन्यांपूर्वी जयस्वाल यांनी त्याला कामावरून कमी केले होते. त्यांना जयस्वाल यांच्या घराची इत्यंभूत माहिती होती. त्याने अन्य दोन आरोपींना हाताशी धरून हा चोरीचा कट रचला. त्यानुसार तिघेही गुरुवारी रात्री राजेंद्र जयस्वाल यांच्या घरी गेले. जयस्वाल हे घरी नव्हते. हे त्यांना माहिती होते. चौकीदार होता, मात्र तो झोपलेला होता. सादिकने घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख व सोन्या-चांदीचे दागिने काढले. अन्य दोघेजण बाहेर उभे होते. यानंतर तिघेही तेथून पसार झाले. सकाळी ही चोरीची घटना उजेडात आली.
यांनी केली कारवाईपोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे, रामनगरचे ठाणेदार प्रदीपकुमार शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलीक, एकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रकाश बल्की, नितीन साळवे, मिलिंद जांभुळे, सुभाष गोहोकार, धनराज करकाडे संजय आतकुलवार, अविनाश दशमवार, चंदू नागरे, अमजद खान, सुभाष गोहोकर यांच्यासह ४५ जणांनी ही कारवाई केली.
जप्त केलेला मुद्देमालसोन्याची चेन व लाॅकेट २३७ ग्रॅम, नऊ नग सोन्याच्या अंगठ्या २२३ ग्रॅम, सोन्याचा नेकलेस ५३.२३० ग्रॅम, पाच नग सोन्याच्या चेन ८७.८९० ग्रॅम, तीन नग सोन्याचे मंगळसूत्र १३२.२७० ग्रॅम असा एकूण ७६ तोळे साेन्याचे दागिणे जप्त केले.
चोरीला गेलेल्या मुद्देमालाशिवायही दागिणे जप्तचांदीचा कंबरपट्टा ३३९ ग्रॅम, सोन्याचा लेडीज कडा ५१.१५० ग्रॅम, चार जोड चांदीच्या चाळ ६०२ ग्रॅम, चांदीचे ब्रेसलेट ७.२३० ग्रॅम, चांदीचा छल्ला १९.७२० ग्रॅम, दोन चांदीचे करंडे ४५.२८ ग्रॅम, एक चांदी नाणे ५.२३ ग्रॅम असा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
आरोपींना विविध ठिकाणाहून अटकसादीक शेख याला गडचिरोली, चेतन तेलसे याला नागपूर तर महेश श्रीरामवार याला चंद्रपूरातून अचक करण्यात आली आल्याची माहिती पोलीस अधीक्षक साळवे यांनी दिली.
नकोडामध्ये ठेवला चोरीचा मुद्देमालआरोपींनी घुग्घुस गाठले. तेथे सादीकचा नातेवाईक शेख नवाझ शेख दादामियाँ (४३) रा. वार्ड क्रमांक १ नकोडा याच्याकडे चोरीचा मुद्देमाल ठेवून विविध भागात गेले होते. पोलिसांनी शेख नवाझच्या घरून १४ लाख १६ हजार ४०० रुपये जप्त केले.