परिमल डोहणे, चंद्रपूर : वाहनातून गौण खनिजाची वाहतूक करताना वाहनाला ताडपत्री लावणे बंधनकारक असतानाही अनेक जण चालक याकडे कानाडोळा करतात. मात्र चालकांनी आता असा कानाडोळा केला, तर ५० हजार रुपये दंड व परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात या कारवाईसंदर्भात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे गौण खनिज वाहून नेताना ताडपत्रीने कव्हर न करणे वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती घाट, वीट्टभट्टी, कोळसा खाणी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची, विटांची, कोळशाची वाहतूक केली जात असते. गौण खनिजाची वाहतूक करताना वाहनाला ताडपत्रीने पूर्णत: झाकून नेण्याचा नियम आहे. मात्र, अनेक चालक याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी तेथून निघणारी धूळ इतर वाहन चालकांच्या डोळ्यात जाऊन अपघाताची शक्यता असते. यावर आळा घालण्याच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२४ पासून गौण खनिज वाहतूक करताना जर वाहनाला ताडपत्रीने पूर्णत: झाकले नसेल, तर ५० हजार रुपयांपर्यंत दंड व परवाना निलंबित करण्याचा इशारा आरटीओ किरण मोरे यांनी दिला आहे.
असा होणार दंड :
कोळसा, राख, विटा, वाळू आदी गौण खनिजाची वाहतूक करताना वाहनास ताडपत्रीने झाकले नसताना आढळून आल्यास दहा हजार रुपये दंड व दहा दिवस परवाना रद्द, दुसऱ्यांदा आढळून आल्यास २० दिवस परवाना निलंबन व २० हजार रुपये दंड, तिसऱ्यांदा आढळून आल्यास ५० हजार रुपये दंड व ५० दिवस परवाना रद्द करण्यात येणार आहे.बॉक्स
संयुक्त बैठकीत झाला होता निर्णय :
गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनास ताडपत्री कव्हरने न झाकून वाहतूक करणाऱ्या वाहनावर परवाना निलंबनाची विभागीय व दंडनीय कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, आरटीओ किरण मोरे यांच्या उपस्थितीत ११ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्याची प्रभावी अंमलबजावणी १ जानेवारी २०२४ पासून करण्यात येत आहे.
गौण खनिजाची वाहतूक करताना जर वाहनाला ताडपत्रीने पूर्णत: झाकले नसल्यास आता ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडासह परवाना रद्द करण्यात येणार आहे. रस्ते अपघात टाळण्याच्या अनुषंगाने याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे गौण खनिजाची वाहतूक करताना वाहनाला ताडपत्रीने पूर्णत: झाकूनच वाहने रस्त्यावर चालवावीत.-किरण मोरे, आरटीओ, चंद्रपूर