पैसेवारीचा फटका : अंतिम पैसेवारीची प्रतीक्षासिंदेवाही : ५० टक्के कमी पैसेवारी असलेल्या गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र यामध्ये चंद्रपूर जिल्हा व सिंदेवाही तालुक्यातील एकाही गावाचा समावेश नाही. तालुक्यात अल्प पावसाने तथा किडीच्या प्रादुर्भावाने दुष्काळाचे सावट पसरले आहे. परिणामी यावर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता बळावली आहे.मृगाच्या प्रारंभी धो-धो बरसलेल्या पावसाने नंतर चांगलीच पाठ फिरविली. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अपेक्षीत पाऊस बरसला नाही. त्यामुळे कधी मोटरपंपाच्या साहायाने तर कधी तलाव, बोड्यामधून पाणी देऊन पीक वाचविण्याचा शेतकऱ्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. तालुक्यात १८ हजार हेक्टर जमीन धानपिकाची लागवड आहे. पाऊस वेळोवेळी दगा देत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती कायम आहे. मागील दोन वर्षापासून तालुका दुष्काळाच्या छायेत आहे. यावर्षी पावसाचे त्यापेक्षा कमी प्रमाण असून बोड्या, तलाव, नदी, कोरडे झाले आहे. शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने व किडीच्या प्रादुर्भावाने हातातून जाण्याची शक्यता अधिक आहे. शासनाच्या कृषी विभागातर्फे अनुदानावर देण्यात येणाऱ्या औषधांचा पुरवठा अत्यल्प आहे. दुसरीकडे पैसेवारीच्या दुष्टचक्रात शासनाने शेतकऱ्यांना अडकविले आहे. तालुक्यात नजरअंदाज पैसेवारी ६० ते ७० पैसे असली तरी अंतिम आणेवारी ही ५० टक्के खाली येणे अपेक्षित असल्याने शासन याबाबत सुधारित निर्णय घेते का? याकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)
शेतकरी संकटात तरीही दुष्काळमुक्त!
By admin | Published: October 24, 2015 12:39 AM