जीवघेणे खड्डे : रस्ता दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्षबोखर्डी : कोरपना तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या व वणी येथे जाण्यासाठी गडचांदूर-भोयगाव हा एकमेव रस्ता आहे. मात्र या रस्त्याची पावसामुळे पुरती वाट लागली असून गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही. परिसरातील नागरिक बरेच वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची प्रतीक्षा करीत आहेत. परंतु विभागीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षीतपणामुळे या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे मागणी करुनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष का होते, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.गडचांदूर-भोयगाव मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावरील खड्डयामुळे वाहनाचे होणारे नुकसान व कित्येक जण दरवर्षी रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडत आहेत. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्याचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून भोयगाव ते नदीपर्यंतचा रस्ता हा ‘मौत का कुवा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.या रस्त्याने वेस्टर्न कोल्डफिल्ड विरूर गाडेगाव, अंबुजा सिमेंट कंपनी, माणिकगड कंपनी, एलअॅन्डटी कंपनी, मुरली नारंडा कंपनी असल्यामुळे नेहमी जड वाहनाची रिघ असतो. तसेच हा मार्ग कमी किलोमिटरचा असल्याने हजारो लहान मोठी वाहने या मार्गाने धावतात. त्यामुळे या रस्त्याची खुपच खराब अवस्था झाली असल्याने दुरूस्तीची मागणी होत आहे. (वार्ताहर)
गडचांदूर-भोयगाव रस्त्याची दुरवस्था
By admin | Published: October 07, 2016 1:16 AM