राजुरा : माणिकगड पहाडावर गर्द जंगलात आणि जंगली श्वापदाच्या सान्निध्यात अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करून गुजराण करणाऱ्या कोलामांना आपल्या वास्तव्याचे प्रमाण मागितले जात आहे. सरकार त्यांच्या योजना अडवून बसले आहे. शासकीय यंत्रणेने जंगलात जाऊन त्यांची वेळीच नोंद घेतली असती तर आज पुरावा मागण्याची वेळच आली नसती. आदिम कोलामांच्या शोषणाला शासनव्यवस्थाच जबाबदार असून, त्यांच्या गुड्यावरील दुरवस्थेचा हिशेब मांडण्यासाठी सोमवारी राजुरा येथे आदिम समुदायाने ढोल सत्याग्रह केले. कोलामांचे पारंपरिक वाद्य असलेल्या ढोलांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचून कोलामांना न्याय मिळेल का, असा सवाल कोलाम विकास फाउंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी उपस्थित केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यासह कोरपना व राजुरा येथील आदिम कोलाम समूदायाचे ढोल सत्याग्रह आंदोलन कोलाम विकास फाउंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. राजुरा येथील भवानी मातेचे पूजन करून हजारो कोलाम ढोल वाजवित उपविभागीय कार्यालयावर धडकले. ढोलाच्या तालावर थिरकणारी पावले अन् आपल्या परंपरेला साजेसे लाल-पांढरे झेंडे, पूजेचे सामान असलेले वडगे घेतलेला कोलामांचा जत्था पाहताना राजुरावासीय दंग झाले. आदिम कोलामांना संपूर्ण संरक्षण मिळावे, विनाअट वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, कोलामगुड्यावर तातडीने मूलभूत सोयी-सुविधा बहाल करण्यात याव्यात, गेल्या दहा वर्षांत बांधण्यात आलेल्या घरकुल व शौचालय बांधकामाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी यासह खावटी अनुदान, उत्तम शिक्षण व आरोग्य अशा अनेक मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले. उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी कोलामांचा लढा सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे असून, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडला गेलेला नाही यातच शासन प्रशासनाचा पराभव आहे. सरकारने जागे होऊन कोलामांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पुजू कोडापे, सचिव मारोती सिडाम, नानाजी मडावी, वाघूजी गेडाम व अन्य सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.