गोंडपिपरी:
तालुक्यातील बोरगाव येथील एका ३५ वर्षीय इसमाने कौटुंबिक वादामध्ये पत्नीस सहकार्य करणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात महिला गंभीररित्या जखमी झाली असून जखमी महिलेवर गोंडपिंपरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले आहे.
घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
बोरगाव येथील संघमित्र फुलझेले (३५) या युवकाच्या गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीशी वाद झाला. यात त्याने पत्नीला मारहाण केली असता पत्नीने घरातून पळ काढत शेजारी राहणाऱ्या दर्शना सयाजी झाडे (५५) या महिलेच्या घरी आश्रय घेतला होता. याचाच द्वेष म्हणून गुरुवारी आरोपी संघमित्र फुलझेले याने माझ्या कौटुंबिक वादात हस्तक्षेप केल्याच्या द्वेष भावनेने घरी असलेल्या दर्शना सयाजी झाडे या महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. हे नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी हल्ला करणाऱ्या मद्यधुंद आरोपी संघमित्र फुलझेले याला चांगलाच चोप दिला. पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेत हल्ल्यात जखमी झालेल्या महिला दर्शना झाडे हिला प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपास ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मोगरे व सहकारी करीत आहे.