घनश्याम नवघडे
नागभीड : येथे एक बसस्थानक व एक बसथांबा आहे. पण या दोन्ही ठिकाणचा घसा कोरडा आहे. येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपला घसा ओला करण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते, नाही तर उपाहारगृहांचा आधार घ्यावा लागतो.
कोरोनाचा प्रकोप कमी झाला आहे. जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे. लोकही बाहेर पडायला लागली आहेत. त्यातच आता उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. बसस्थानकावर बऱ्यापैकी गर्दी दिसायला लागल्यामुळे पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
येथे बसस्थानक आणि जुना बसस्टाॅप ही येथील बसस्थानके आहेत. नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना नागभीड हे मध्यवर्ती स्थान आसल्याने या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या जिल्ह्यातील बस तथा ट्रॅव्हल व अन्य वाहनांची नागभीड येथूनच आवागमन होत असते. असे असले तरी या दोन्ही स्थानकावर पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, हे विशेष. बसस्थानकावर केवळ विश्रामगृहाच्या वतीने एक छोटासा नळ लावण्यात आला आहे.
या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तहान लागल्यानंतर आपला घसा ओला करायचे म्हटले तर पाणी विकत घ्यावे लागते नाही तर बसथांब्यानजीक असलेल्या उपाहारगृहाचा आधार घ्यावा लागत आहे. येथील राममंदिर चौकात ग्रामपंचायत आणि राममंदिर व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने एका प्याऊची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र पाच वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणात हा प्याऊ तोडण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी प्याऊची निर्मिती करण्यात आलीच नाही.