लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : केंद्र सरकारने कोळसा खाणीत शंभर टक्के विदेशी गुंतवणुकीला दिलेली मंजुरी मागे घ्यावी, या प्रमुख मागणीसह चार ज्वलंत मागण्यासाठी कोल इंडीयातील केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या एक दिवशीय बंदला वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात जोरदार समर्थन मिळाले. इंटक, आयटक, एचएमएस, सिटू आणि भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.२४ सप्टेंबरला सकाळी ७ वाजतापासून शेकडो कामगार सास्ती टाऊनशीप येथील मुख्य महाव्यवस्थापक कार्यालयापुढे जमले. यानंतर या कामगारांनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. येथून हे कामगार सर्व कोळसा खाण परिसरात फिरले. क्षेत्रातील सास्ती एक्सपान्शन, गोवरी, पोवनी, गोवरी डीप, बल्लारपूर या ओपनकास्ट व सास्ती, बल्लारपूर भूमिगत तसेच क्षेत्रीय कार्यालय या सर्व कार्यालय आणि माईन्समध्ये फक्त अधिकारी कामावर होते. त्यामुळे कोळसा व माती उत्खनन पुर्णपणे बंद होते. कोळसा डिसपॅचही ठप्प होते. एकही ट्रक अथवा रेल्वे वॅगनमध्ये कोळसा भरण्यात आला नाही. या आंदोलनात ठेकेदारी मजुरांनी सहभाग घेतला. ठेकेदारी पध्दतीने माती उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांनी कामगाराअभावी उत्खनन बंद ठेवले.सास्ती व गोवरी टाऊनशीप येथे झालेल्या कामगारांच्या सभेत मान्यवरांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामगार व शेतकरीविरोधी नितीचा जाहीर निषेध केला. सरकार श्रम करणाऱ्या कामगारांचे हक्क हिरावून घेऊन संघटनांना कोळसा उद्योगातून बेदखल करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत सर्व कामगारांनी एकजूट ठेवून संघर्ष करण्यास सिध्द व्हावे, असे आवाहन केले.व्यवस्थापनाने नोटीस काढून कामगारांना आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन केले आणि संपात भाग घेतल्यास कार्यवाही करण्याची सूचना दिली. मात्र कामगारांनी व्यवस्थापनाची सूचना धुडकावित संप शंभर टक्के यशस्वी केला. भारतीय मजदूर संघ या आंदोलनात सहभागी नसल्याचे व्यवस्थापनाने सांगून कामगार संघटनांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला. याला आक्षेप घेत भामसंचे नेते अनिल निब्रड यांनी भामसंचा संप सुरुच असल्याचा निर्वाळा दिला. या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे केंद्रिय अध्यक्ष नंदकिशोर म्हस्के, मधुकर ठाकरे, रायलिंगू झुपाका, दिलीप कनकूलवार, इंटकचे आर शंकरदास, सुदर्शन डोहे, रामनरेश यादव, ईश्वर गिरी, एचएमएसचे अशोक चिवंडे, लोमेश लाडे, प्यारेलाल पुंडे, संग्रामसिंह, सिटूचे शेख जाहीद आदींनी केले.माजरी पूर्णपणे बंदमाजरी : वेकोलि माजरी येथे पाचही कामगार संघटनाने बंद पुकारले असून हे संप शंभर टक्के यशस्वी झाले आह. आज माजरीचे कोळसा उत्पादन, कोळसा वाहतूक, डिस्पॅच, पाणी फिल्टर प्लांट सर्वच बंद आहे. या बंदमुळे वेकोलि माजरीला करोडो रुपयांचे नुकसान झाले असून जर मागणी पूर्ण झाली नाही तर दिल्ली येथे आंदोलन करू, असा इशारा एचएमएसचे अध्यक्ष जयणारायण पांडे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी इंटकचे सचिव धनंजय गुंडावर ,एचएमएसचे दत्ता कोंबे, आयटकचे अध्यक्ष दीपक ढोके, बंडू उपरे, सिटू अध्यक्ष मेहमूद खान, बिरेंद्र गौतम, बीएमएसचे दीपक डोंगरावर, विवेक फालके आदी उपस्थित होते.ऊर्जाग्राममध्ये निदर्शनेताडाळी : महाप्रबंधक कार्यालय वणीक्षेत्र उर्जाग्रामच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर इंटक, एसएमएस, एटक, सिटू, अशा चारही कामगार संघटनांनी संयुक्त एक दिवसीय संप पुकारला. यावेळी वेकोलि कर्मचाऱ्यांनी खाण परिसरातच शासनाच्या विरोधात निदर्शने केली. घुग्घूसच्याही खाणी बंद होत्या.अशा आहेत मागण्याकोळसा उद्योगात शंभर टक्के एफडीआयचा निर्णय रद्द करावा.सर्व कोल कंपनी मिळून एकच कोल इंडीया कंपनी बनवावी.कोळसा खाणीतील ठेकेदारी प्रथा बंद करुन सर्व कंत्राटी कामगारांना नोकरीत नियमित करावे.कामगारांसाठी सुरु असलेल्या मृत्यूनंतर आश्रितांना नोकरी देण्याची योजना पूर्ववत सुरु ठेवावी.
कोळसा खाणीत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 6:00 AM
व्यवस्थापनाने नोटीस काढून कामगारांना आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन केले आणि संपात भाग घेतल्यास कार्यवाही करण्याची सूचना दिली. मात्र कामगारांनी व्यवस्थापनाची सूचना धुडकावित संप शंभर टक्के यशस्वी केला. भारतीय मजदूर संघ या आंदोलनात सहभागी नसल्याचे व्यवस्थापनाने सांगून कामगार संघटनांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देवेकोलि कर्मचारी संपावर : वेकोलिला कोट्यवधींचा फटका