घोसरी : पोंभूर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव मोरे अंतर्गत उपकेंद्रातील आरोग्य सेवक व सेविकांचे पदे दो-तीन वर्षांपासून रिक्त असल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे. मात्र याकडे क्षेत्रातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असून गाव पातळीवर वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांना खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.नवेगाव मोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात २६ गावे समाविष्ट असून घाटकूळ, देवाडा (बुज), घोसरी, वेळवा, नवेगाव मोरे ही पाच उपकेंद्र आहेत. आरोग्याच्या दृष्टीने केंद्रांतर्गतची अनेक गावे संवेदनशिल असून अनेकदा या परिसरातील नागरिकांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. उपकेंद्रात आरोग्य सेवक व सेविका कार्यरत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. पर्याय म्हणून रुग्ण खासगी उपचार करून घ्यावा लागतो. त्यामुळे परिसरातील राजकीय पुढाऱ्यांची कार्यतत्परता कुठे हरविली, असा प्रश्न विचारला जात आहे. घोसरी उपकेंद्रातील आरोग्य सेवकाचे पद तीन वर्षांपासून रिक्त असून आरोग्य सेविकेचीसुद्धा बदली झाली असून कंत्राटी आरोग्य सेविकेची (प्रसुती) एक वर्षांपासून पदभरती केलेली नाही. परिणामी येथील उपकेंद्र रामभरोसे ठरले असून तीव्र कुपोषण बालक तसेच गरोदर व स्तनदा मातांना शासनाच्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई होत आहे. उपकेंद्रात सेविका नसल्याने गरोदर माताना प्रसुतीसाठी गडचिरोली- चंद्रपूर येथे नेताना आर्थिक व मानसिक त्रास नातलगाना सहन करावा लागत आहे. विशेष करुन परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून गावातील रुग्णांना शोध घेवून उपचार करीत रुग्णांची लुबाडणूक करीत आहेत. तरीपण तापाने फणफणाऱ्या रुग्णांना तात्पुरता दिलासा मिळत असल्याने शासनाच्या ‘डॉक्टर आपल्या दारी’ या योजनेचा पुरता बोजवारा उडताना दिसत आहे.त्यातल्या त्यात देवाडा (बुज) उपकेंद्रातील आरोग्य सेविकेची बदली झाल्याने रुग्णसेवा प्रभावित झालेली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आरोग्य केंद्रातील रिक्त असलेली पदे तातडीने भरावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
आरोग्य सेविकांअभावी रुग्णसेवा प्रभावित
By admin | Published: November 25, 2014 10:53 PM