जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गुप्ता एनर्जी व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा घुग्घुस : नजिकच्या उसगाव रस्त्यावरील गुप्ता एनर्जीच्या १०३ प्रकल्पग्रस्तांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. या संदर्भात कामगार आयुक्तांकडे व्यवस्थापन व कामगार संघटनाची बैठक झाली. मात्र व्यवस्थापनाने वेतनही नाही व कामही देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी वाढल्या असून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तोडगा काढण्याची मागणी केली आहे. गुप्ता एनर्जी मध्ये घुग्घुस, उसगाव, पांढरकवडा, शेणगाव परिसरातील शेतकऱ्यांची कृषी उपजाऊ शेती गेली. १०३ प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्या. मात्र तीन वर्षांपासुन कारखाना बंद पडला आहे. त्यामुळे त्या कामगारांना १५ ते २० दिवस रोटेशन पध्दतीने काम दिले जात असले तरी नियमित वेतन देत नसल्याने कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कामगार संघटना, व्यवस्थापकाची बैठक झाली. त्यात व्यवस्थापनाने थकीत वेतन व काम देण्यास असमर्थता व्यक्त केली. कामगार आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून समस्या मार्गी लावण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. याबाबत सोमवारी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याची दखल घेण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
वेतनाअभावी प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची पाळी
By admin | Published: January 18, 2017 12:38 AM