लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड तालुक्यात गणेशोत्सवावर कोरोनाचे चांगलेच सावट दिसून येत आहे. या सावटाचा परिणाम म्हणून की काय तालुक्यातील ६५ गावांमध्ये सार्वजनिक गणपतीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली नाही.
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे गेल्या दीड वर्षापासून सार्वजनिक उत्सवांवर विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. सद्यस्थितीत काही बाबींवरील निर्बंध थोडे शिथिल करण्यात आले असले तरी सार्वजनिक उत्सवांवरील निर्बंध म्हणावे तेवढे कमी करण्यात आलेले नाहीत. सार्वजनिकरीत्या गणपतीच्या मूर्तींची स्थापना करणाऱ्या मंडळांना कोरोनाकाळ असल्याने विविध अटी आणि शर्तीचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गणेश मंडळांनी गणपती मूर्तीची स्थापना न करण्याचा निर्णय घेतला असावा, असे तालुक्यात चित्र आहे. नागभीड तालुक्यात ६५ गावांत गणेशमूर्तींची स्थापनाच करण्यात आली नसल्याची माहिती आहे.
नागभीड तालुक्यात ११० गावे असून, नागभीड आणि तळोधी हे दोन पोलीस ठाणे आहेत. नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ६८ गावे असून, यातील २१ गावांत गणपतीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आहे. तळोधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४२ गावे असून, या गावांपैकी २४ गावांमध्ये गणपतीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. नागभीड पोलीस ठाण्यांतर्गत १५ गावांमध्ये, तर तळोधी ठाण्यांतर्गत सात गावांत ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
आता मस्कऱ्या गणपतीकडे लक्ष
या गणपती उत्सवानंतर मस्कऱ्या गणपतीचा उत्सव येतो. या मस्कऱ्या गणपतीचा उत्सवही नागभीड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मस्कऱ्या गणपती उत्सवाकडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे.