अतिवृष्टीचा फटका : आठवडाभर पाण्यात राहून बियाणे सडले गेवरा : ‘निसर्ग देवो भव्’ हे ब्रिदवाक्य असले तरी निसर्ग कोपला तर सर्वच काही बिघडू शकते, याची प्रचिती मागील वर्षीच्या कोरड्या दुष्काळाची झळ आणि चालू खरीप पिकाची सुरूवातीलाच झालेली दैना, यावरून येते. आता दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. हे नैसर्गिक दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. मागील वर्षातील कोरड्या दुष्काळाची झळ सोसत शेतकरीवर्ग कसाबसा कुठल्याही आर्थिक मदतीविना सावरत खरीप हंगामाच्या तयारीला लागला. बियाणांची जुळवाजुळव करून शेतात बियाणे पेरणी केली. मृगापूर्वी बरसणारा वरूणराजा गेवरा परिसरामध्ये बरसलाच नाही. शेतकरी जून अखेरपर्यंत खरीपपूर्व तयारी करून पावसाची वाट बघत राहिला. हवामान विभागाचे अंदाज चुकवत नेहमीप्रमाणे आपल्या लहरीपणाचा परिचय देत २७ जूनपासून या परिसरात पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या केल्या आणि त्याच आठवड्यात जोरदार वर्षावृष्टी होवून शेतकऱ्यांनी जमवाजमव करून पेरलेली बियाणे अती पाण्याने खराब झाली. भरपूर पावसाच्या तडाख्यात आठवडाभर संपूर्ण भातपिकाच्या बांद्या तुडुंब भरून राहिल्या. संपुर्ण आठवडाभर संततधार बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बिघडवून टाकले आहे. आता बियाणे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अनेक कंपन्यांकडून बाजारपेठेतील खरेदी केलेली बियाणे उगवण झाली नसल्यानेही काही शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (वार्ताहर)
दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत
By admin | Published: July 15, 2016 1:03 AM