नगरपालिकेचे दुर्लक्ष : अनुचित घटना घडण्याची शक्यताब्रह्मपुरी : चांदगाव रस्त्यालगत बऱ्यापैकी वस्ती निर्माण झाली आहे. पण या रस्त्याला लागून घाणीचे साम्राज्य व रस्त्याच्या दुतर्फा अनावश्यक झाडे वाढलेली आहेत. यामुळे या वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ब्रह्मपुरी शहराची वाढ चारही बाजूने मोठ्या प्रमाणात झाली आहे. पण त्या मानाने सुविधा पुरविण्यात यंत्रणा सक्षम नसल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे. चांदगाव रोड हा रात्रंदिवस वर्दळीचा रस्ता आहे. या परिसरात शेकडो नागरिक घरे बांधून राहत आहेत. या रस्त्याने चांदगाव व इतरत्र खेडोपाडी जाणारे- येणारे नागरिक असंख्य आहेत. शिवाजी चौकापासून नाल्यांचे घाण पाणी या परिसरणात साचून मोठा डबका तयार झाला आहे. हा डबक्यातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. या घाणीच्या डबक्यात डुकरे, कुत्रे दिवसभर बसून राहत असल्याने महिलांना व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्याच्या दुर्तफा अनावश्यक वनस्पतीचे जंगल वाढल्याने रस्त्यावरील अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात नागरिकांनी प्रशासनाला लेखी व तोंडी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रशासनाच्या विरुद्ध असंतोष पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनाने लक्ष घालून समस्या सोडविण्याची मागणी प्रा. भागवत खुणे, मार्कंडराव गहाणे, बाळकृष्ण मासूरकर, भीमराव पाटील, मनिष झोडे व अन्य रहिवाशांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
घाणीमुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: May 28, 2016 1:11 AM