चंद्रपूर : तिमिरातून तेजाकडे जाण्याचा संदेश देणारा दिवाळीचा सण सुरु झाला. या सणाच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत झुंबड उडत आहे. दिवाळीच्या खरेदीची गर्दी बघता व्यापारी रात्री उशिरापर्यंत आपले दुकाने सुरु ठेवत आहे. दिवाळी हा सण दीपोत्सवाचा सण असल्याने सजावटीसाठी इलेक्ट्रीक सिरीजची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. शहरातील बाजारपेठेत विशेषत: चायनामेड सिरीज मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. त्याची किंमत ५० रुपयांपासून तर ५०० रुपयांपर्यंत आहे. या सणाला सर्वाधिक विक्री मिठाई, दागिने व कपड्यांची होत असते. महागाईच्या सावटात बाजारपेठेत रंगीबेरंगी सजावटीचे सामान, इलेक्ट्रीक वस्तूंसह दुकानाच्या रांगा लागत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी खरेदीदारांची गर्दी जास्त असल्याचे मत व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.काही शेतकऱ्यांचे हलके धानपीक व सोयाबीन निघाले आहेत. त्यालाही बाजारपेठेत भाव मिळत नसल्यामुळे यावर्षीची दिवाळी बळीराजासाठी अंधारातच आहे. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी मजेत जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी कर्मचारी, अधिकारी व व्यावसायिक दिवाळी सणाच्या साहित्याची खरेदी करण्याकडे बाजारपेठ गर्दी करू लागले आहेत. यावर्षी जिल्ह्यात वरोरा सोडला तर अद्यापही कापूस खरेदी सुरु झाली नाही. त्यामुळे शेतकरी वरोरा येथे गर्दी करीत आहे. मात्र येथे अत्यल्प भाव देण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांचे भारी धानपिक अजूनपर्यंत निघालेले नाही. परंतु दिवाळी हा सण आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना त्यांना दिवाळीपेक्षा उत्पादनाची चिंता जास्त प्रमाणात सतावत आहे. उत्पन्न जर कमी झाले तर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कशा होईल, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी बाजारपेठेत दिवाळी सणाच्या निमित्ताने साहित्यांची दुकाने सजली असून त्यानिमित्ताने बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)
बाजारपेठेत दिवाळीनिमित्त गर्दी वाढली, दुकाने सजली
By admin | Published: October 20, 2014 11:09 PM