अचानक वैनगंगा नदी फुगली
पिंपळगाव(भो) : ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव भो. येथील जनावरांना चारायला गेलेल्या दोन गुराख्यांना वैनगंगा नदीच्या पुरामुळे झाडावरच मुक्काम करावा लागला. शुक्रवार पासून वृत्तलिहिपर्यंत दोन्ही गुराखी झाडावर असून झाडाखाली जनावरे आहेत.
किशोर मेश्राम (५०), सुधाकर मेश्राम (४५) अशी या गुराख्यांची नावे आहेत. पिंपळगाव भो. येथील गुराखी म्हशी, बकऱ्या गायी चारण्यासाठी वैनगंगा नदी फाट्याच्या पलिकडील लाडज शिवारात नेहमीप्रमाणे गेले. परंतु वैनगंगा नदीला पूर आला. पाणी वाढत असल्याचे लक्षात येताच तीन पुरुष व एक महिला गुराखी जनावरांसह पाण्यात शिरले. कसेबसे ते पाण्यातून सुखरूप निघाले. मात्र दोन गुराखी नदीपलीकडे अटकले असून बकऱ्या, गायी, म्हशी सोबत भर पावसात झाडावर बसून बकऱ्यांना लांडगे खाऊ नये म्हणून रात्रभर झाडावरच मुक्काम केला. ते सुखरुप आहेत. शनिवारी त्यांना डब्बा व पाणी पुरविण्यात आले.