मूल : चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर अंतर्गत सावली, भद्रावती, वरोरा, चंद्रपूर व चिचपल्ली आदी वनपरिक्षेत्र कार्यालय असून चिचपल्ली वनपरिक्षेत्रात कार्यरत बारमाही वन मजुरांना गेल्या मार्च महिन्यापासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. सावली, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा परिक्षेत्रातील वनमजुरांना नियमित वेतन मिळत असताना चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील वनमजुरांना वेतन देण्यासंदर्भात वेगळा शासन निर्णय आहे का, असा प्रश्न उपस्थित करुन वनपरिक्षेत्र अधिकारी पठाण यांच्या अरेरावीपणामुळे वनमजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आल्याचे मजुरांकडून बोलले जात आहे.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाने २२ आॅगस्ट २०१२ ला शासन परिपत्रक निर्गमीत करुन बफर व नॉन बफर अशी विभागनी केली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूर, शिवनी, पळसगाव, मूल, मोहुर्ली, खडसंगी आदी परिक्षेत्रातील ५७१.८२ चौ किमी क्षेत्र आरक्षित करण्यात आले. तसेच नॉन बफर येथील चंद्रपूर वनविभाग चंद्रपूरमध्ये चंद्रपूर चिचपल्ली, वरोरा, भद्रावती, सावली या परिक्षेत्राचा समावेश असून ६२०.३५ चौ. किमी क्षेत्र आरक्षित करण्यात आले. यातील कर्मचारी, वनमजूर यांची बफ व नॉन बफरमध्ये पदस्थापना करण्यात आली. चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर येथे शेकडो वनमजूर कार्यरत असून वन्यप्राण्याचे व वृक्षाचे संरक्षण कार्यालयीन कामकाज आदी निमूटपणे केले जात आहे. वनमजुरांवर जबाबदारी सोपवून अधिकारी मात्र झोपा घेताना दिसतात. मात्र केलेल्या कामाचा मोबदला देण्यास ते दिरंगाई करत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.जणू ते आपल्याच खिशातील पैसा वनमजुरांना देतात की काय, असा आव आणतात. असलाच प्रकार चिचपल्ली वनपरिक्षेत्रात सुरु असल्याचे बोलले जात आहे. चंद्रपूर वनविभाग चंद्रपूरमधील उर्वरित सावली, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा क्षेत्रातील कार्यरत वनमजुरांना नियमित वेतन मिळत असताना मात्र चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील वनमजुरांना वेतन गेल्या तीन महिन्यापासून मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. वैद्यकीय उपचार, नातेवाईकांचे लग्न, किराणा सामान आदी बाबींची पूर्तता करण्यात अडचणीचे जात आहे. शासन निर्णयाची पायमल्ली करणाऱ्या अशा वनपरिक्षेत्राधिकारी यांची उचलबांगडी होणे गरजेचे असल्याचे मत मजुरांकडून व्यक्त केले जात आहे. हिच स्थिती चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील इतरही कामाबाबत असावी असे बोलले जात आहे. वनपरिक्षेत्रामधील वनमजुरांची होणारी उपासमार थांबविण्यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
वन मजुरांचे वेतन अडल्याने उपासमारीची पाळी
By admin | Published: May 25, 2015 1:43 AM