चंद्रपूर : ग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या अधिकारी, कर्मचारी त्रस्त झाले आहे. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे फाईल्स पाठवूनही त्या १५ ते २० दिवपर्यंत वापस येत नाहीत. अनेकदा मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना वेटिंगवर राहावे लागते. विशेष म्हणजे, अनेकवेळा तर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचा स्वीय सहाय्यकच अडवून ठेवत असल्याची तक्रार आहे. मात्र यासंदर्भात बोलण्यास कुणीही तयार नाही.जिल्हा परिषदेमध्ये अनेक विभाग आहे. या विभागांतर्गत विविध कामांसाठी विभागप्रमुखांकडून मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे फाईल्स पाठविल्या जातात. या फाईल्स सामान्य प्रशासन विभागातून नंबर लिहून त्या सीईओंकडे पाठविण्यात येतात. मात्र अनेकदा त्या सीईओंकडे पोहचत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. या फाईल्स स्वीय सहाय्यकांकडेच काही दिवस पडून राहात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कामांना विलंब होत असून वेळ वाया जात आहे. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचा स्वीय सहाय्यक अनेकवेळा अधिकारी, कर्मचाऱ्यांना कॅबीनच्या बाहेर अडवून ठेवत असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. एखाद्यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी कामाच्या व्यस्ततेमुळे अधिकाऱ्यांना वेळ देवू शकत नाही. हे ठिक असले तरी, अनेकवेळा त्यांना केबीनच्या बाहेर तिष्ठत ठेवले जात असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याकडे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे.काही कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर असल्याने ते अधिकाऱ्यांचे काम ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे शासकीय नियमाप्रमाणे एक तर, त्यांची बदली करावी किंवा टेबल बदलवून द्यावा, अशी मागणी आहे. विशेष म्हणजे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक मागील अनेक दिवसांपासून एकाच टेबलवर असल्याने त्यांची वागणूक कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरत असल्याची ओरड आहे. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या संपत्तीचे विवरण जाहीर करून तसा फलक कार्यालयाबाहेर दर्शनी भागात लावला होता. भ्रष्टाचारमुक्त अधिकारी अशी ओळख निर्माण करणाऱ्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांचा वचक जिल्हा परिषदेतील अंतर्गत विभागाकडेही तेवढाच राहावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (नगर प्रतिनिधी)
फाईल्स अडकल्याने जि.प.चे अधिकारी, कर्मचारी त्रस्त
By admin | Published: June 21, 2014 1:27 AM