चंद्रपूर : यंदा अत्यल्प पाऊस पडला. याचा मोठा फटका धानपिकाला बसला आहे. यंदा पाण्याअभावी ४० टक्क्यांच्या आत उत्पादन होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली जात आहे.मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी आणि चिमूर परिसरात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत पावसाने दडी मारली होती. परिणामी रोवणीची कामे खोळंबली. त्यानंतर रोवणीच्या कामास शेतकऱ्यांनी सुरवात केली. सप्टेंबर महिन्यापासून मोठा पाऊस न झाल्याने भाताची शेती संकटात सापडली आहे. सावली, मूल आणि पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना आसोलामेंंढा तलावाचे पाणी मिळत होते. यावर्षी नहराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यातच संपूर्ण कालव्यास भेगा पडल्या आहेत. अधिकारी नहराच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आसोलामेंढा तलावाचे पाणी शेतीला न मिळता वाहून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळणे अशक्य झाले आहे. हरणघाट उपसा जलसिंचन योजनेचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दोन महिन्यांपुर्वी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाणी मिळत नसल्याने धानपिके वाळू लागली आहेत. हरणघाट उपसा सिंचन योजनेचे पाणी दिघोरीपर्यंत सोडल्यास भाताची शेती हाती येऊ शकते. या गंभीर प्रश्नाकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाणी सोडण्याच्या सूचना द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी सिंचाई विभागाकडे केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पावसाअभावी धानाचे उत्पादन घटणार
By admin | Published: November 16, 2014 10:48 PM