राज्य शासनाने निर्बंध उठविल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ५० टक्के तत्त्वावर बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा, चिमूर, राजुरा चार आगार आहेत. कोरोनामुळे सर्व बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या; मात्र राज्य शासनाने निर्बंध हटविल्यानंतर काही प्रमाणात बसफेऱ्या धावत आहेत. जिल्ह्यातील चारही आगारातून पूर्वी २१० बसफेऱ्या धावायच्या. सद्यस्थितीत १०० बसफेऱ्या धावत आहेत. पूर्वी लांब पल्ल्यासाठी म्हणजे पुणे, औरंगाबाद, हैदराबाद अशा रातकालीन रातराणी बस धावायच्या. मात्र या बसला पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याने महामंडळाने या बसफेऱ्या बंद केल्या; परंतु याच मार्गावर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स धावतात. त्यातही त्यांना मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असून, भरगच्च धावत आहेत. याउलट महामंडळाच्या बसमध्ये प्रवासीच मिळत नसल्याची ओरड आहे.
बॉक्स
पुणे मार्गावर गर्दी
चंद्रपूर येथून पुणे, औरंगाबाद, हैदराबाद येथे मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स धावतात. लॉकडाऊनमुळे या फेऱ्या बंद होत्या; मात्र आता पूर्वीप्रमाणेच धावत आहेत. सद्यस्थितीत पुणे मार्गावर गर्दी दिसून येत आहे; परंतु पूर्वीप्रमाणे अद्यापही प्रवासी मिळत नसल्याचे खासगी ट्रॅव्हल्स संचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बॉक्स
ट्रॅव्हल्सचे तिकीट जास्त, तरीही गर्दी
महामंडळाने लांब पल्ल्याच्या अंतरासाठी रातराणी बसफेऱ्या सुरू केल्या होत्या. या बस पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, नांदेड येथे धावत होत्या. या बसफेऱ्यांचे तिकीट खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा कमी होते; परंतु या बसफेऱ्या काही दिवस सुरळीत चालल्या. त्यानंतर प्रवासी मिळत नसल्याने या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या.
खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांची झोपण्याची व्यवस्था असते. यासोबतच टीव्ही तसेच मोफत नेट उपलब्ध केला असतो. या सुविधा बसमध्ये नसतात, त्यामुळे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सचा वापर करतात.
कोट
महामंडळाच्या रात्रकालीन लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या पूर्वी धावत होत्या; मात्र त्यांना पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी मिळत नव्हते. त्यामुळे त्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. आता जिल्ह्यातील चारही आगारातून १०० बसफेऱ्या धावत आहेत; मात्र रात्रकालीन बसफेऱ्या बंद असल्याची माहिती आगाराकडून मिळाली.