अमोद गौरकार
शंकरपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. दूध उत्पादकांना चांगलाच फटका बसला आहे. दुधाचे भाव अर्ध्या किमतीवर आले असून पाण्यापेक्षाही दूध स्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांकडून दूध उत्पादन केले जाते. इतकेच नाही तर शासनाने दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून गायी पुरविल्या. काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशांनी गायी घेऊन दूध उत्पादनाची निर्मिती केली. परंतु आता दुधाचा भाव पाण्यापेक्षाही कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे शंकरपूर येथे दोन दूध संकलन केंद्रे आहेत. या दोन्ही दूध संकलन केंद्रामध्ये ३५० दूध उत्पादकांची ११०० लिटरची आवक आहे. लाॅकडाऊनपूर्वी एक लिटर गायीच्या दुधाचे भाव ३० ते ३२ रुपये होते तर म्हशीच्या दुधाचे एक लिटरचे भाव ४० ते ४५ रुपये होते; परंतु आता दुधाचे भाव निम्म्यावर आले असून गायीच्या एक लिटर दुधाचे भाव १५ रुपये तर एक लिटर म्हशीच्या दुधाचे भाव २० ते २२ रुपयाच्या दरम्यान आहे.
बॉक्स
खाद्यांचे भाव मात्र वाढले
या मानाने गायीला देण्यात येणाऱ्या खाद्यांचे भाव मात्र दोनशे रुपयांनी वाढलेले आहे. दूध उत्पादनाचा खर्च वाढला असून उत्पादने बरोबरीत आहे; परंतु दुधाचे भाव कोसळल्याने दूध उत्पादक हवालदिल झाला आहे. अशावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोट
दुधाची आवक भरपूर प्रमाणात आहे. त्यामानाने दूध विक्रीचे प्रमाण कमी आहे. दूध उत्पादकाचे नुकसान होऊ नये म्हणून दूध खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दुधाचे दर कमी करण्यात आले आहे.
-पुरुषोत्तम भोयर, दूध संकलन केंद्र, शंकरपुर.
कोट
दिवसेंदिवस पशुखाद्यांचे भाव वाढत आहे. दूध उत्पादनाचा खर्च वाढत आहे. त्यामानाने दुधाचे भाव अतिशय अल्प आहे. दूध उत्पादन आता परवडणारे नाही. त्यामुळे दूध उत्पादकाना आर्थिक मदत देण्यात यावी.
-वसंता गहुकर, दूध उत्पादक कवडशी (देश).