आयुध निर्माणी : बोटावर मोजता येण्याच्या संख्येत जीवंत असणारा व जगात अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा ‘माळढोक’ पक्षी हौशी छायाचित्रकारांमुळे संकटात सापडला आहे. वरोरा-भद्रावती क्षेत्रातील मोजक्याच गावालगत व शेतशिवारात आढळतो. स्वभावाने लाजाळू, भीत्रा व मानवापासून अंतर ठेवून राहणाऱ्या या माळढोक पक्षाच्या छायाचित्रणासाठी विदर्भातील हौशी छायाचित्रकारांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे या पक्षाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे. अशा हौशी छायाचित्रकारांच्या गर्दीवर प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी पक्षीप्रेमींनी केलेली आहे.वरोरा-भद्रावती परिसरात केवळ हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या संख्येत माढळोक अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रात केवळ दहा ते बाराच्या संख्येने माळढोक पक्षी आढळतात. त्यांपैकी सात-आठ पक्षी भद्रावती-वरोरा परिसरातील शेतशिवार व जंगल परिसरात आढळून येत आहे. स्वभावाने भीत्रा समजला जाणारा हा पक्षी मानवजातीपासून अंतर राखून वावरत असतो. जंगलातील विविध प्रकारचे किडे, किटक, तृण, अळ्या, छोटे साप, विंचू, सरडे आदीचे भक्षण करीत असल्याने तो शेतकऱ्यांचा मित्रही समजला जातो.२०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन मंडळाच्या अत्यंत दुर्मिळ पक्षांच्या यादीमध्ये माळढोक पक्षाचा समावेश करण्यात आला. सध्या भारतात महाराष्ट्रासह इतर पाच राज्यात त्याची संख्या २५०-३०० च्या जवळपास आहे. महाराष्ट्रात दहा-बाराच्या संख्येत असणारा हा पक्षी भद्रावती-वरोरा परिसरात सात-आठ संख्येत असल्याचे बोलले जाते.मागील महिन्यापासून नागपूरसह अन्य क्षेत्रातूनही काही हौशी छायाचित्रकार आपल्या २०-२५ सहकाऱ्यांसह पाच-पाचच्या ग्रुपने वनविभागाच्या विनापरवानगीने माळढोक हमखासपणे आढळणाऱ्या गावालगतच्या शेतशिवारात व जंगल परिसरात मुक्तपणे विहार करून माळढोकचे छायाचित्रण करण्यासाठी भटकत आहेत. स्वत:ची हौस भागविण्याच्या नादात हे छायाचित्रकार माळढोकच्या अस्तित्वालाच धोका ठरण्याची शक्यता पक्षीप्रेमी वर्तवत आहेत. हौशी छायाचित्रकारांचा असाच मुक्त वावर कायम राहिल्यास माळढोक जातच कालबाह्य होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिसरातील पक्षीप्रेमी व शेतकरी यांनी अशा हौशी छायाचित्रकारावर कार्यवाही करून त्यांच्या मुक्तसंचारावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या दुर्मिळ प्रजातीच्या पक्षाच्या जीवीत रक्षणासाठी वनविभागाने संबंधितावर वनकायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे. (वार्ताहर)
हौशी छायाचित्रकारामुळे ‘माळढोक’ पक्षांचे अस्तित्व धोक्यात
By admin | Published: January 08, 2015 10:52 PM