आॅनलाईन लोकमतवरोरा : तब्बल ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर टेमुर्डा परिसरात जंगलात वाघीणीने आपले बस्तान मांडले आहे. या परिसरात एकमेव वाघीण मागील काही वर्षापासून वास्तव्यात असल्यामुळे टेमुर्डा जंगल परिसरात वाघ येण्याचे संकेत वनविभागाकडून मिळाले आहेत.टेमुर्डा जंगल परिसरात ५० वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात वाघाचे वास्तव्य होते, हे आजही ज्येष्ठ नागरिक सांगतात. मात्र सध्यास्थितीत या परिसरात वाघाचे वास्तव्य नसल्याने रानडुकर, रोही, हरीन आदी प्राण्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. वनविभागाने अथक परिश्रम घेतल्याने व नागरिक जंगलात जावू नये, याकरिता लोकसहभागातून अनेक उपक्रम राबविल्याने परिसरातील जंगल घनदाट झाले आहे.जागोजागी वनविभागाने पाणवठे तयार केल्याने वन्यप्राणी गावात येण्याच्या घटना कमी झाल्याचे नागरिक सांगतात. अशातच टेमुर्डा परिसरातील जंगलात काही वर्षांपासून एका वाघीणीने बस्तान मांडले आहे. जंगलातील प्राण्याची वाघीण शिकार करीत असल्याने ती पूर्णपणे विकसित झाल्याचे मानले जात आहे.वाघीण पूर्णपणे विकसित झाल्याने ती वाघाला आपल्याकडे आकर्षीत करु शकते, असे मानले जात आहे. त्यामुळे टेमुर्डा जंगल परिसरात वाघ येण्याचे संकेत असल्याने वनविभागाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे वनधिकारी व वनकर्मचारी सतर्क झाले आहेत. कित्येक वर्षांनंतर या परिसरात वाघ व वाघीणीचे वास्तव्य राहणार असल्याने वन्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.शेगाव परिसरात वाघटेमुर्डा परिसरातील शेगावला जंगल परिसर लागून आहे. मागील काही वर्षांपासून शेगाव जंगल परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा वाघ टेमुर्डा जंगल परिसरातील वाघीणीकडे जाण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. वरोरा तालुक्यातील वाघांच्या वास्तवाने वनविभागाला मोठ्या व्यापक उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे मानले जात आहे.
वाघिणीच्या वास्तव्यामुळे टेमुर्डा परिसरात वाघ येण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:55 PM