पूर्वसूचना दिली नाही : प्रकल्पाचे काम पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यतावरोरा : तालुक्यातील उद्योग, पिण्याचे पाणी व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरु पाहणाऱ्या वर्धा नदीतील मार्डा येथील सिमेंट बंधाऱ्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरु आहे. वर्धा नदीत अचानक पाणी सोडल्याने बंधाऱ्याचे काम प्रभावित झाले असून येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात काम बंद ठेवण्यात येते. त्यामुळे या प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होणार नसल्याचे मानले जात आहे.वरोरा तालुक्यातील मार्डा गावानजीकच्या वर्धा नदीच्या पात्रात ७५ कोटी रुपये खर्च करुन औद्योगिक मंडळाच्या वतीने सिमेंट बंधाऱ्याचे काम डीएनआर इम्फ्रा कंपनीच्या वतीने सुरु करण्यात आले. कामाला चांगली गती मिळाल्यानंतर अनुदानाअभावी मागील चार महिन्यांपासून काम बंद ठेवण्यात आले होते. मे महिन्यात बंधाऱ्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यात नुकतेच वर्धा नदीमध्ये धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने या कामामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी शिरल्याने काम प्रभावित झाले आहे. जमीन पातळीवर दुसऱ्या टोकाचे काम सुरू असताना पाणी शिरल्याने पाणी काढण्याकरिता मोठमोठे इंजीन लावून पाण्याचा उपसा केला जात आहे. इंजिनला लागणाऱ्या डिझेलवर कंत्राटदाराचा मोठा खर्च होत आहे. यासोबतच त्यामध्ये गाळ तयार झाल्याने गाळ उपसून काम कसे करावे हाही प्रश्न उभा ठाकला आहे. येत्या काही दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात नदी पात्रामध्ये कुठलेही काम पाणी अधिक राहिल्याने करता येत नाही. त्यामुळे चार महिने काम बंद ठेवावे लागणार असल्याने प्रकल्प डिसेंबर २०१५ पर्यंत पूर्ण होण्याची आशा मावळली आहे. (तालुका प्रतिनिधी)यवतमाळचे अंतर होणार कमीमार्डा येथील सिमेंट बंधारा सात मीटर रुंदीचा असून त्यावर साडेचार मीटर रुंदीचा रस्ता तयार होणार आहे. यावरुन लहान मोठे वाहने जाणार असल्याने यवतमाळ जिल्ह्यात जाण्याचे अंतर कमी होणार आहे.खड्ड्यात अपघाताची शक्यतानदी पात्रात बंधाऱ्याचे काम सुरु आहे. सिमेंट पिल्लरकरिता मोठे खड्डे खोदण्यात आले आहे. नदीत पाणी आल्यामुळे पाणी खड्ड्यात जावून गाळ तयार झाल्याने तिथे सिमेंट पिल्लर उभारणे एवढ्यात शक्य नाही. त्यामुळे या खड्ड्यातील पाण्यात पावसाळ्याच्या दिवसात अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सेट्रिंगचे ७० कामगार बसूननदीच्या पात्रात खोदलेल्या खड्ड्यात सिमेंट पिल्लर उभारण्यासाठी सेट्रींग लावण्यात येते. सेट्रींग पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने लावता येत नाही व गाळ असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे काम नसल्याने मागील पाच दिवसांपासून ७० कामगार कामाविना बसले आहेत. त्यामुळे त्यांच्या रोजीचा प्रश्नही कायम आहे.कुठलीही पूर्वसूचना दिली नाही व नदीत पाणी सोडण्यात आल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पाण्याचा उपसा करणे व गाळ काढणे यावरही कंपनीला आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अतिरक्त खर्चाची दरतूद शासनाने करावी. - के. एम. मुथ्थन्ना, मार्डा बंधारा व्यवस्थापक डीएनआर इम्फ्रानदीतील पाण्यामुळे खालील पातळीच्या कामात पाणी शिरल्याने काम पूर्णत: ठप्प झाले आहे. त्यानंतर पावसाळा लागणार असल्याने काम बंद राहते. त्यामुळे दिलेल्या अवधीत काम पूर्ण होण्यास विलंब लागणार आहे.- एच. डी. कुलकर्णी, उपविभागीय अभियंता, औद्यागिक विकास
वर्धा नदीत पाणी सोडल्याने सिमेंट बंधाऱ्याचे काम प्रभावित
By admin | Published: May 28, 2015 12:01 AM